ताज्या घडामोडी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलात ‘दर्पण दिन’ साजरा

माध्यमांनी सामाजिक भान जागृत ठेवावे- प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे

*

नांदेड, दि. 6 (प्रतिनिधी): आज नव्या माध्यमांमुळे नवी आव्हानं उभी आहेत. पत्रकाराच्या लेखणीची धार समाज बदलू शकते. बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, गोपाळ आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही समाजाला दिशा देणारी होती. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपली प्रतिष्ठा, विश्वासार्हता कायम ठेवावी. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करतांना केवळ सनसनाटी निर्माण करणारी पत्रकारिता न करता माध्यमांनी सामाजिक भान जागृत ठेवावे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू प्रा. डॉ. माधुरी देशपांडे यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलात दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. देशपांडे बोलत होत्या. यावेळी प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. शशिकांत ढवळे, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. चंद्रकांत बाविस्कर, माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना डॉ. देशपांडे म्हणाल्या की, लोकशाहीत पत्रकारितेची भूमिका अनन्यसाधारण आहे. पत्रकार हा वेगवेगळ्या भूमिकेतून समाजाला ज्ञान देण्याचं काम करत असतो. अनिष्ट गोष्टीत वाहून न जाता ज्यांना आवाज नाही त्यांचा आवाज होऊन समाजातील समस्या, प्रश्न शासनकर्त्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी पत्रकारांनी मूकनायक बनले पाहिजे. लेखणीची धार ही कुठल्याही स्थितीत तलवारीपेक्षा कमी नाही, म्हणून पत्रकारांनी समाजभान आणि विविध घटकांचं ज्ञान ठेवलं पाहिजे. महाराष्ट्राला लाभलेला पत्रकारितेचा वारसा आपण पुढे घेऊन गेला पाहिजे, अशी अपेक्षा देखील डॉ. देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रभारी कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे बोलतांना म्हणाले की, सत्य माहितीसोबतच मनोरंजन करण्याचे काम प्रसारमाध्यमं करत असतात. पित पत्रकारिता या मीडियाच्या वेगळ्या बाजूवर चिंतन होण्याची आवश्यकता आहे. सुधारणेला जिथे वाव आहे तिथे पत्रकारितेचे महत्त्व असल्याचे डॉ. ढवळे यांनी अधोरेखित केले. तर अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांनी पत्रकारांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला उजाळा दिला. पत्रकारिता क्षेत्रातील निराशेचा सूर आणि सध्याची परिस्थिती यावर चिंतन होण्याची गरज असल्याचे डॉ. बाविस्कर यांनी मत व्यक्त केले. मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध प्रसारमाध्यमात कार्यरत संकुलाचे माजी विद्यार्थी अविनाश पाईकराव, दिव्या तौर, पवन जगडमवार, दिनेश येरेकर, सूरज कौउटकर, मिलिंद वाघमारे आणि डॉ. भास्कर भोसले यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी मोनिका तिडके तर उपस्थितांचे आभार डॉ. सुहास पाठक यांनी व्यक्त केले. यावेळी प्रा. डॉ. दीपक शिंदे, डॉ. सचिन नरंगले, प्रा. प्रज्ञाकिरण जमदाडे, प्रा. गिरीश जोंधळे, डॉ. कैलाश यादव, संशोधक विद्यार्थी साहेब गजभारे, प्रीतम लोणेकर, सचिन खंडागळे, भारती तांबे, प्रियांका निखाते, आरती कोकुलवार, सय्यद गफार, महेंद्र डुलगच, विजय हंबर्डे, आसाराम काटकर यांच्यासह माध्यमशास्त्र संकुलाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

*****

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.