यशवंत ‘ मध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स आणि कृत्रिम बुद्धिमतेवर व्याख्यान संपन्न

नांदेड : (दि.१२ सप्टेंबर २०२५)
यशवंत महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या वतीने माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ‘इंटरनेट ऑफ थिंग्स : भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर अतिथी व्याख्यान पीएम उषा उपक्रमांतर्गत संपन्न झाले.
प्रमुख व्याख्याते भट्टाचार्य प्रतिष्ठान, पुणेचे संचालक डॉ.अजय देशमुख उपस्थित होते.
प्रारंभी गणित विभागप्रमुख डॉ. निरज पांडे यांनी मान्यवरांचे स्वागत फुलांचे रोपटे देऊन केले. प्रमुख अतिथींचा परिचय डॉ. योगेश टी.नकाते यांनी करून दिला.
डॉ. अजय देशमुख यांनी व्याख्यानाचे तीन भागांमध्ये विवेचन केले. आयओटीचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य.
भूतकाळ मांडताना त्यांनी मशीन-टू-मशीन कम्युनिकेशन, एम्बेडेड सिस्टीम्स, वायरलेस नेटवर्क्स आणि सेन्सर तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने आयओटीची झालेली सुरुवात सांगितली.
वर्तमानातील स्थितीवर बोलताना त्यांनी स्मार्ट होम्स, औद्योगिक स्वयंचलन, शेती, आरोग्यसेवा व वाहतूक क्षेत्रातील एलओटीचे विविध अनुप्रयोग स्पष्ट केले. स्मार्ट वेअरेबल्स, प्रिसिजन फार्मिंग, इंटेलिजंट व्हेइकल्स आणि स्वयंचलित वैद्यकीय उपकरणे ही उदाहरणे त्यांनी मांडली तसेच क्लाउड कम्प्युटिंग व डेटा ॲनालिटिक्स यांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली.
भविष्यातील आयओटीविषयी बोलताना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, एज कम्प्युटिंग आणि फाईव्ह जी, सिक्स जी तंत्रज्ञानामुळे होणारे बदल यावर सविस्तर चर्चा केली. यामुळे स्मार्ट सिटीज, ऊर्जा कार्यक्षम प्रणाली आणि सुधारित जीवनमान घडेल असे त्यांनी सांगितले. विशेषतः विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग, सेन्सर डिझाईन, एम्बेडेड सिस्टीम्स आणि सायबर सिक्युरिटी या क्षेत्रांमध्ये कौशल्य विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी करिअरच्या संधी, आयओटी डिव्हाइसची सुरक्षा आणि उद्योजकतेच्या शक्यता याबाबत प्रश्न विचारले. डॉ. देशमुख यांनी या प्रश्नांना मार्गदर्शक व प्रेरणादायी उत्तरे दिली. शिक्षकवर्गानेही चर्चेत सहभाग घेतल्यामुळे सत्र अधिक समृद्ध झाले.
या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना आयओटीच्या व्याप्तीबाबत सखोल ज्ञान मिळाले, तसेच तंत्रज्ञानाचा समाजहितासाठी कसा वापर करता येतो, याविषयी गंभीरपणे विचार करण्यास विद्यार्थी प्रवृत्त झाले.
इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या ध्येयाला या उपक्रमामुळे बळकटी मिळाली.
शेवटी आभार प्रा. संदीप एस. राठोड यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.गौतम दुथडे, डॉ.प्रवीणकुमार मिरकुटे, प्रा.अर्जुन गुरखुदे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, अभय थेटे, नवनाथ धुमाळ, जगन्नाथ महामुने, श्री.लिंगायत आणि इलेक्ट्रॉनिक विभागातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.