यशवंत महाविद्यालयातील अद्ययावत उपकरणांचा जास्तीत जास्त उपयोग घ्यावा:डी.पी.सावंत

–
नांदेड:(दि.१७ जून २०२५)
यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात पीएम उषा योजनेअंतर्गत इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कॉपी व अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपी या अद्ययावत अशा उपकरणांचे उद्घाटन दि.१६ जून रोजी श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री श्री.डी.पी.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते तर प्रमुख अतिथी संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.आर.के. शेंदारकर व कोषाध्यक्ष ॲड.उदयराव निंबाळकर उपस्थित होते.
इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीचा उपयोग सेंद्रिय आणि अजैविक संयुगे ओळखण्यासाठी, त्यांचे विश्लेषण करण्यासाठी तसेच औषधांच्या संरचनेचा अभ्यास करण्यासाठी आणि नवीन औषधे विकसित करण्यासाठी होतो.त्याचबरोबर गुन्हेगारी तपासात, इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीचा उपयोग नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी, पर्यावरण, अन्नातील भेसळ, आर्कियोलॉजी आदी क्षेत्रात होतो तर यूव्ही स्पेक्ट्रोस्कोपीचा उपयोग रासायनिक संयुगांची ओळख आणि प्रमाण निश्चित करण्यासाठी व प्रथिने, न्यूक्लिक ऍसिड आणि इतर सेंद्रिय संयुगांचे विश्लेषण करण्यासाठी व रंगद्रव्यात होतो.
यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग हा फक्त मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील नावाजलेला विभाग असून या विभागामध्ये अतिशय अद्ययावत असे( सीआयसी ) कॉमन इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर असून दि. १६ जून रोजी विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी दिनी दोन उपकरणांची भर टाकण्यात आली. ही उपकरणे अतिशय अद्ययावत असून या उपकरणांचा उपयोग जास्तीत जास्त विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांनी घेऊन संशोधन क्षेत्रामध्ये आपले व महाविद्यालयाचे नावं करावे, असे आवाहन श्री. डी.पी.सावंत यांनी केले व प्राचार्य व प्राध्यापकांचे कौतुक केले.
प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, यशवंत महाविद्यालयात असलेल्या सुविधांबद्दल तसेच नियमित होणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.
प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.एम.ए.बशीर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.विजय भोसले यांनी केले. शेवटी आभार सीआयसी समन्वयक डॉ. संभाजी वर्ताळे यांनी मानले.
कार्यक्रमास रसायनशास्त्र विभागातील डॉ.सुभाष जुन्ने, डॉ.शिवराज शिरसाठ, डॉ. संदीप खानसोळे, डॉ.मदन आंबोरे, डॉ.निलेश चव्हाण, डॉ.के.एल.केंद्रे, डॉ.दत्ता कवळे, डॉ.अनिल कुंवर, डॉ. शांतुलाल मावसकर, डॉ.संतोष राऊत आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी सहकार्य केले.