छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘यशवंत ‘ मध्ये विशेष व्याख्यान संपन्न

*
नांदेड (दि.२६ फेब्रुवारी २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य’ या विषयावर दि.२५ फेब्रुवारी रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी भूषविले. याप्रसंगी विचारमंचावर माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, प्रमुख व्याख्याते नारायणराव वाघमारे महाविद्यालय, आखाडा बाळापूर येथील इतिहास विभागप्रमुख डॉ. प्रकाश वाघमारे आणि व्याख्यानमालेचे समन्वयक हिंदी विभागप्रमुख डॉ.संदीप पाईकराव यांची उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन व कार्य आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे. महाराजांच्या जीवनातील विविध पैलू समजून युवकांनी त्यापासून प्रेरणा घेणे आवश्यक आहे, असे विचार व्यक्त केले.
प्रमुख व्याख्याते डॉ.प्रकाश वाघमारे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ राजकीय संघर्ष करून स्वराज्य उभे केले नाही, तर जमिनीची मोजणी करून प्रतवारी ठरविणे, दुष्काळात शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करणे, जलसिंचन अशा विविध लोकउपयोगी योजनांच्या व कार्याच्या आधारे स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर केले. रयतेच्या हितासाठी स्वराज्य निर्माण करून त्यांनी समतेच्या तत्त्वावर राज्यकारभार केला. त्यांच्या कार्यातून सामाजिक सलोखा, आदर्श शासनव्यवस्था आणि समता यांचे महत्त्व अधोरेखित होते.
प्रारंभी प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.संदीप पाईकराव यांनी केले तर आभार प्रा.राजश्री भोपाळे यांनी मानले.
व्याख्यानास डॉ.गौतम दुथडे, डॉ.साईनाथ शाहू, प्रा.शांतूलाल मावस्कर, डॉ.राजरत्न सोनटक्के, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.शिवराज बोकडे, डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड, डॉ.साईनाथ बिंदगे, डॉ.विजय भोसले, डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ. कविता केंद्रे, डॉ.मीरा फड, डॉ.एल.व्ही. पदमारानी राव आदी प्राध्यापक, विद्यार्थी व इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. कैलास इंगोले, स्वयंसेवक आणि यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.