डॉ. सुप्रिया पेडगावकर यांच्या दोन पुस्तकांचे शानदार कार्यक्रमात प्रकाशन …..
स्त्रियांची अर्धी दुखणी मनाशी संबंधित, उपचार करताना स्त्रीरोगतज्ञांनी अंतर्मनात डोकावले पाहिजे" - डॉ. वृषाली किन्हाळकर

नांदेड, 2 फेब्रुवारी:
स्त्रियांची अर्धी दुखणी ही त्यांच्या मनाशी संबंधित असतात, त्यामुळे उपचार करताना स्त्रीरोग तज्ज्ञांनी केवळ शरीरावर नाही तर तिच्या अंतर्मनामध्ये डोकावले पाहिजे. बाईच्या मनात असंख्य गोष्टी साचून राहिलेल्या असतात. बाईला बोलण्यासाठी हक्काची जागा हवी असते, स्त्रीरोगतज्ञांनी तपासणी करताना बाईच्या वेदना समजून घ्यायला हव्यात असे मत प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका व कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी व्यक्त केले.
त्या नांदेड येथील डॉ. सुप्रिया पेडगावकर लिखित ‘स्त्री आरोग्य ‘ (मराठी) आणि ‘वुमेन्स हेल्थ’ (इंग्रजी अनुवाद) या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
डॉ. किन्हाळकर पुढे म्हणाल्या, “बाईच्या शरीरातील वेदना, बाळंतपण, सिझेरियन, रोग यांच्या पलीकडे जाऊन तिच्या मनातील वेदना समजून घेणं गरजेचं आहे.स्त्री ही केवळ गर्भाशय आणि अंडाशय असलेले भांडे नसून तीही एक माणूस आहे. डॉ. सुप्रिया पेडगावकर यांनी हेच आपल्या लेखनातून मांडले आहे. स्त्रीरोग तज्ज्ञांनी रुग्णांना केवळ ‘बाई’ म्हणून न पाहता ‘माणूस’ म्हणून समजून घेण्याची गरज आहे, आणि या दृष्टिकोनातून हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे.”
या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी भूषविले. यावेळी प्रा. डॉ. अरुण महाले, डॉ. किशोर अतनूरकर, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, लेखिका डॉ. सुप्रिया पेडगावकर, आणि इंग्रजी अनुवादक भीमराव राऊत यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सुप्रिया पेडगावकर यांनी आपल्या लेखन प्रवासाबद्दल सांगताना, “आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे मला लिखाणाची प्रेरणा मिळाली. रुग्णांच्या अनुभवातून आणि त्यांच्या भावनिक आयामांवर विचार करताना हे पुस्तक साकार झाले,” असे सांगितले.
डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी डॉ. सुप्रिया यांच्या कार्याची प्रशंसा करत, “महापालिकेत आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी कुठलाही गाजावाजा न करता प्रामाणिकपणे काम केले आहे. अशा संवेदनशील डॉक्टर आमच्या टीममध्ये असल्याचा मला अभिमान आहे,” असे मत व्यक्त केले.
डॉ. किशोर अतनूरकर यांनी “स्त्री होणं आणि स्त्रीपण निभावणं किती अवघड आहे, हे आम्हाला अनुभवातून कळाले आहे.उपचार करताना स्त्रीयांच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक आणि कौटुंबिक आरोग्याचा विचार करणे आवश्यक आहे,” असे सांगितले. त्यांनी पुरुष नसबंदीबाबत जागरूकतेची गरजही अधोरेखित केली.
प्रा. डॉ. अरुण महाले यांनी “डॉ. सुप्रिया यांनी लिहिलेले पुस्तक अतिशय सोप्या भाषेत आहे. आरोग्य शिक्षण देताना मराठीतील क्लिष्ट भाषा अडथळा ठरते, पण हे पुस्तक रुग्णांना समजावून सांगण्यासाठी प्रभावी ठरेल ” अशी प्रशंसा केली.
पुस्तकाचे इंग्रजी अनुवादक भीमराव राऊत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रांजली जोशी आणि जयंत वाकोडकर यांनी केले, तर डॉ. अमित पेडगावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी पुस्तक निर्मितीमध्ये योगदान दिल्याबद्दल विजयकुमार चित्तरवाड, राहुल हाटकर व मुर्तुजा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला नांदेड शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत मंडळी, स्त्रीरोगतज्ञ, साहित्यिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाने वैद्यकीय व साहित्यिक क्षेत्रात स्त्री आरोग्याच्या नव्या पैलूंवर प्रकाश टाकला.
.
एका मुलीवर कुटुंब थांबविण्याचा अभिमान!
डॉ. वृषाली किन्हाळकर
37 वर्षांपूर्वी एका मुलीवर कुटुंब थांबवायचे असे ठरविले होते. त्याकाळी घेतलेल्या निर्णयाचा आज कोणताही पश्चाताप मला होत नाही. त्या काळात प्रॅक्टिस करताना माझ्या रुग्णालयात प्रसूतीनंतर मुलगी झाली की लोक दवाखाना बदलायचे. माझ्या रुग्णालयात मुलगी होते म्हणून त्या नंतर माझ्या रुग्णालयात त्या महिलेची प्रसुती करण्यासाठी कधीही येत नसत. मुलगी झाल्यानंतर सिझरिन झाले की दवाखाना बदलायचे. परंतु त्या काळात मी एका मुलीवर थांबण्याचा निर्णय घेतला. अनुकरण करण्याची क्रिया ही हळूहळू व मंद होणारी आहे. त्याकाळी लोक आमच्या घराचे बांधकाम व इंटेरियर बघण्यासाठी मोठ्या संख्येने येत असायचे, परंतु मी घेतलेल्या निर्णयाचे अनुकरण करणारे फार थोडे लोक समाजात आहेत याचे वैशम्य वाटते.