ताज्या घडामोडी

निष्कलंक चारित्र्याने देशाची सेवा करणारा निष्काम कर्मयोगी कै. डॉ. शंकरराव चव्हाण : प्रोफेसर रामराज पंडितराव गावंडे

दररोज हजारो माणसं जन्मास येत असतात आणि मरतही असतात परंतु ,त्यातील काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच माणसं आपल्या आठवणीत व स्मरणात राहतात. महाराष्ट्राच्या मातीने या देशाला जी अनमोल रत्ने दिली त्या मौल्यवान रत्नांपैकी कै. डॉ. शंकरराव चव्हाण हे होत .शंकराव चव्हाण यांचा जन्म दिनांक 14 जुलै 1920 रोजी पैठण तालुक्यातील ढोकेफळ या गावी झाला आणि मृत्यू दिनांक 26 फेब्रुवारी 2004 रोजी झाला आज त्यांची जयंती , त्यानिमित्त अनेक वर्षे सत्तेमध्ये राहूनही सत्तेचा अभिनिवेश न बाळगणारे, निष्कलंक चारित्र्याने देशसेवा करणारे महान कर्मयोगी कै. डॉ.शंकराव चव्हाण यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. त्यांच्या आचरणातील पवित्र्याला कोटी कोटी प्रणाम.
आज शंकररावजी चव्हाण आपल्या मध्ये नाहीत परंतु हजारो एकर कोरडी जमीन पाण्याखाली आणून शेतकऱ्यांच्या जीवनात खरी क्रांती घडवून आणणारे क्रांतिकारक म्हणून शंकराव चव्हाण या भागातील शेतकऱ्यांच्या अंत:करणात जे घर करून बसले आहेत त्याचा कधीही विसर पडणे शक्य नाही. त्यांनी बांधलेली धरणे म्हणजेच कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांची जिवंत स्मारके होत .येणाऱ्या अनेक पिढ्या त्यांच्या या कर्तव्याच्या डोंगराला विनम्र अभिवादन करीत राहतील .या स्मारकाच्या माध्यमातून आपली चेतना जागवीत राहतील.
कुसुमताईंनी शंकराव चव्हाण यांना एवढ्या कुशलतेने व यशस्वीपणे सांभाळलं की कुसुम ताई गेल्यानंतर शंकरावांना मनातून अस्वस्थ वाटू लागलं .एक विरक्तता त्यांच्या वागण्यात दिसू लागली .66 वर्षाच्या संसारात कुसुमताई अचानक आजारी झाल्या आणि दिनांक 28 फेब्रुवारी 2003 रोजी गुरुवारी त्यांचे निधन झाले. जवळपास एक वर्षानंतर गुरुवारी याच दिवशी शंकराव चव्हाण यांचे निधन झाले. कुसुमताई आणि शंकराव चव्हाण यांच्या जीवनगाठी किती घट्ट होत्या त्याचाच हा प्रत्यय . एका चारित्र्यसंपन्न ,स्वच्छ ,सामाजिक राजकीय जीवनाची अखेर झाली. त्यांचा तो पन्नास वर्षाचा सुवर्णकाळ पुन्हा महाराष्ट्रात येणे नाही .हाती आलेली सत्ता गरिबांसाठी वापरणारा सचोटीचा प्रशासक पुन्हा होणे नाही. आजच्या भ्रष्टाचाराने लथपथ झालेल्या राजकारणात शंकरराव चव्हाण कुठेच शोभणारे नव्हते.
आज देशामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहे, भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनत चालला आहे .प्रत्येक क्षेत्रात घोटाळा सुरू आहे.उच्च पदस्थ व्यक्तीकडे जनता आज खुलेआम बोट दाखवत आहे .या सर्व गदारोळामध्ये कै. शंकरराव चव्हाण मात्र धुतल्या तांदळासारखे स्वच्छ वाटू लागतात .माझ्यामध्ये शंकरराव चव्हाण यांचे वादातीत निष्कलंक असे राजकीय चारित्र्यच त्यांच्या यशाचे गमक आहे.बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले ,आज शिक्षण क्षेत्रात देणगीच्या स्वरूपात प्रचंड भ्रष्टाचार सुरू झाला आहे .शिक्षक .प्राध्यापक. शिपाई .क्लार्क या सर्व पदांचे दर ठरलेले आहेत .परंतु या सर्व गदारोळामध्ये शंकरराव चव्हाण यांनी स्थापन केलेली श्री शारदा भवन शिक्षण संस्था अजून तरी या रोगापासून दूर आहे . हे लोकांचं, कुणाचं तरी ऐकून मी म्हणत नाही तर गेल्या 30 वर्षातला हा माझा स्वतःचा अनुभव आहे . चहा .नाश्ता आणि मुलाखतीला उशीर झाला तर संध्याकाळचं जेवण देऊन उमेदवाराला नोकरी देणारी माझ्या उभ्या आयुष्यात बघितलेली एकमेव संस्था म्हणजे श्री शारदा भवन शिक्षण संस्था होय .स्वतः शंकरराव चव्हाण या देणगीच्या विरोधात होते. निश्चितच शंकराव चव्हाण हे एक त्यागी व्यक्तिमत्व होते .एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारची व्यापक आणि जोखीमीची आव्हाने पेलावी लागू शकतात याचे हे एक मूर्तीबंत उदाहरण होते. जोखीम ,मर्यादा आणि प्रामाणिकपणा या सर्वांच्या मर्यादा ओलांडणारी जी काही थोडी उदाहरणं असतात त्यामध्ये शंकररावजी चव्हाण यांचा समावेश अतिशय वरच्या पातळीवरचा आहे.
नव्या पिढीने ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा अशी माणसे आता दुर्मिळ होत चालली आहेत. जीवनाची वाटचाल प्रमाणिकपणे व सरळपणे करता येते ,यावरील लोकांचा विश्वास उडत चालला आहे .अशा अस्थिर, धक्काधक्कीच्या वातावरणात ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा व आमचे नेते म्हणून अभिमानाने सांगावे असा मराठवाड्याचा थोर सुपुत्र म्हणजे शंकरावजी चव्हाण. राजकारण म्हणजे मोहजाळ आहे या मोह जाळात चांगले चांगले फसतात ,त्यापासून चार हात दूर राहणे एवढी साधी गोष्ट नाही. परंतु सतत 50 वर्षे सत्तेत राहूनही ते सर्व सचोट्यावर उतरले होते कोणी बोट दाखवावे असे वावगे काम शंकराव चव्हाण यांनी आपल्या उभ्या आयुष्यात कधीही केलेले नाही .पाच पैशाच्या भ्रष्टाचाराची नोंद त्यांच्या नावे दिसून येत नाही. भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ म्हणून शंकराव चव्हाण यांचा आपणास सार्थ अभिमान वाटतो.
शंकराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या नेतेपदी असते वेळेस संपूर्ण महाराष्ट्राचा भौगोलिक अभ्यास करून त्या त्या विभागातील लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. जायकवाडी, पूर्णा प्रकल्प , विष्णुपुरी प्रकल्प व मन्याड नदीवरील धरण यामुळे मराठवाड्यातील कोरडी राणे भिजून खरी हरितक्रांती झाली आहे .निश्चितच या हरितक्रांतीचे जनक म्हणून चव्हाण हे पिढ्यानपिढ्या एखाद्या दीपस्तं भा सारखे मार्गदर्शक ठरत राहतील असा विश्वास वाटतो. विष्णुपुरी प्रकल्प हा संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठा लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट मिळवण्यासाठी शंकरावजींना आकाश पाताळ एक करावे लागले होते .हे सारे प्रकल्प उभारण्यात त्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेचा प्रत्येय जागोजागी येतो .म्हणूनच भारताच्या पाठ बंधारे नकाशात मराठवाड्याचे स्थान ठळकपणे नोंदल्या गेले. श्रीमती इंदिरा गांधी व राजीव गांधी हे दोघे दिवंगत पंतप्रधान महाराष्ट्राचे शिल्पकार कै.यशवंतराव चव्हाण पी .व्ही. नरसिंहराव या सर्व राष्ट्रीय नेत्यांचा संपूर्ण विश्वास शंकर रवांनी संपादन केला होता. शंकराव चव्हाण यांच्यावर एखादी जबाबदारी टाकली तर ती यशस्वीपणे पार पाडतील याची सर्व नेत्यांना खात्री होती . हा माणूस स्वच्छ प्रतिमेचा ,कुशल कारभार करणारा समर्थ प्रशासक आहे हे या सर्वांनी हेरले होते म्हणूनच केंद्रामध्ये दोन वेळा त्यांना आवर्जून गृहमंत्री या पदासाठी देशातील सर्वात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. ज्यांच्या खांद्यावर आपण विश्वासाने मान टाकावी असा हा विश्वासू माणूस आहे असे म्हणून घेण्याची पात्रता सिद्ध करून दाखविण्याला शंकरावांना किती कठोर परिश्रम आणि तपश्चर्या करावी लागली असेल याचा विचार आपण केला पाहिजे. देशाचा विकास ,देशाची अखंडता हा त्यांचा ध्यास होता .देशाच्या अखंडते बाबतीत कसलीच तडजोड त्यांना मान्य नव्हती. संपूर्ण देशाच्या राजकारणावर त्यांची छाप होती .शंकराव चव्हाण अतिशय भाग्यवान गृहस्थ होते .1947 ला भारत स्वतंत्र झाला .1948 ला हैदराबाद संस्थान स्वतंत्र झाला पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी दीर्घकाळ सत्ता भोगली. सत्ता माणसाला अनैतिक बनवते आणि सर्वकष सत्ता ही सर्वंकष अनैतिक बनवते .हे जरी खरे असले तरी ,या सिद्धांताला देखील शंकराव चव्हाण यांसारखे तपस्वी अपवाद ठरले होते ही वस्तुस्थिती आहे.
शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुबत्ता आणण्यासाठी शंकराव चव्हाण यांनी रात्रंदिवस अथक्क परिश्रम घेतले .पाण्याअभावी कोरडी ठाक पडलेल्या जमिनीला, धरणीला ओलिताखाली आणून हिरवा शालू नेसवण्याचे काम आदरणीय शंकराव चव्हाण साहेब यांनी केलं असा हा मह नमान्य नेता ,आधुनिक राजर्षी म्हणजे आपला मौलिक ठेवा होय. आपल्यासमोरचा प्रेरक आदर्श होय .म्हणून त्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे .हे आभाळा एवढे कर्तुत्व अजून थोडेफार तरी वर्ष देशाला हवे होते ,महाराष्ट्राला हवे होते. परंतु मराठवाड्याचा हा आधारवड कोसळला आणि संपूर्ण मराठवाडा पोरका झाला .शंकर रावांच्या निधनाने महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मराठवाड्याच्या राजकारणात निश्चितपणे एक मोठी पोकळी निर्माण झाली ही पोकळी कदाचित उद्या भरून निघेल ही ,परंतु त्यांना लाभलेले भारदस्त वलय , राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाचा वेध घेणारी दूर दृष्टी मिळेलच असे वाटत नाही.
शंकरराव चव्हाण यांना गुरुस्थानी मानणारी ,त्यांच्यावर आचल निष्ठा असणारी हजारो माणसं आपल्याला आजही भेटतात. म्हणून शंकरराव चव्हाण गेले ही बातमी आली तेव्हा अनेकांना हुं दके आवरता आले नाहीत .न जाणे कित्येक निराधार, कष्टकरी, शेतकरी ,कामगार, कर्मचारी यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणून त्यांचे संसार सुखी करण्याचे महान कार्य शंकरावजींनी केले याची कल्पनाच केलेली बरी .त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अनेकांनी अश्रू ढाळले. सर्वसामान्य माणसं कृतज्ञ असतात अशी आगळीवेगळी कृतज्ञता शंकराव चव्हाण यांच्या अंत्यष्टीच्या वेळी दिसून आली. शंकरराव चव्हाण नावाचं वादळ जरी आज थांबलेलं असलं तरी त्यांचे लाडके सुपुत्र माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे शंकर रावांचे लाडके सुपुत्र एवढे भांडवल अशोक रावांना जीवनभर पुरणारे आहे .शंकराव चव्हाण यांच्या अंगा खांद्यावर खेळलेले अशोकराव चव्हाण बोलून चालून शंकरराव जी चव्हाण यांच्या पोटचा गोळाच. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू अशोकरावांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले .अशोक रावांच्या व्यक्तिमत्त्वावर ,कार्य करण्याच्या शैलीवर ,बोलण्यावर, चालण्यावर निव्वळ शंकरराव चव्हाण यांचा प्रभाव जाणवतो. शंकरराव चव्हाण यांच्यावर जिवापाड प्रेम करणारे तळहाताच्या थोड्या प्रमाणे जपणारी हजारो माणसं आजही अशोकरावांच्या पाठीमागे आहेत. मग अशोकराव चव्हाण कोणत्याही पक्षात असो त जिथे अशोकराव तिथे आम्ही अशा प्रकारची भावना जनतेच्या मनामध्ये असते.
शंकरराव चव्हाण यांची बरीचशी अर्धवट राहिलेली कामे ,त्यांची स्वप्न अशोकरावांना पूर्ण करावयाचे आहेत .मुदखेड ,भोकर ,अर्धापूर एवढेच नव्हे तर महाराष्ट्र ,मुंबई आणि दिल्लीपर्यंत आपल्या यशाची पताका फडकवायची आहे .शंकरराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये राहत असलेली पवित्र जनता अशोकरावांना पावलोपावली जपणार आहे यात कुठलीही शंका नाही.
ओसाड रान भिजवून खरी हरितक्रांती करणारा क्रांतिकारक शंकरराव चव्हाण पुन्हा एकदा जन्माला यावा अशी साई चरणी व तथागताच्या चरणी विनम्र प्रार्थना करावी वाटते.
काळाच्या पडद्याआड गेलेल्या कै. शंकरराव चव्हाण रुपी गोदाकाठच्या शिल्पाला कोटी कोटी प्रणाम.
मिलना था इतेफाक बिछडना नसीब है
दर्द तो होता है बिछडने का उनसे जो दिल के बेहद करीब है

प्रोफेसर रामराज पंडितराव गावंडे
यशवंत महाविद्यालय नांदेड
9850147743

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.