फोंडाघाट महाविद्यालयात रॅगिंगविरोधी जागृती व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

फोंडाघाट (ता. कणकवली) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समिती व पथक तर्फे रॅगिंगविरोधी जागृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉ. राजाराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंगच्या दुष्परिणामांवर सखोल मार्गदर्शन केले.
आपल्या प्रभावी व्याख्यानात डॉ. पाटील म्हणाले, “रॅगिंग ही परंपरा नसून ती एक सामाजिक गुन्हा आहे. रॅगिंगमुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणाव, नैराश्य आणि भीतीच्या गर्तेत सापडतात. अनेकदा त्यांना शिक्षणापासून दूर व्हावे लागते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी एकमेकांशी स्नेह, मैत्री आणि सहयोगाची परंपरा जोपासली पाहिजे. रॅगिंगमुक्त परिसर घडवणे हीच खरी विद्यार्थीपरंपरा आहे.” तसेच त्यांनी रॅगिंगचे कायदेशीर परिणाम अधोरेखित करताना स्पष्ट केले की, दोषी विद्यार्थ्याला महाविद्यालयातून हकालपट्टी, शिष्यवृत्ती रद्द करणे तसेच पोलीस कारवाई व तुरुंगवास अशी कठोर शिक्षा होऊ शकते. “विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ असलेल्या महाविद्यालयीन जीवनात अशा प्रकारच्या चुकीच्या कृतींना कधीही स्थान देऊ नका” असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की, “विद्यार्थ्यांमधील स्नेह, अनुशासन आणि परस्पर आदर हीच आपल्या महाविद्यालयाची खरी ओळख आहे. रॅगिंगविरोधी उपक्रम राबवून महाविद्यालय सुरक्षित आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करत आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लेफ्टनंट डॉ. राज ताडेराव यांनी केले. त्यांनी रॅगिंगविरोधी जागृतीची गरज स्पष्ट करून विद्यार्थ्यांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. बाजीराव डाफळे यांनी मानले. या व्याख्यानास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाविद्यालय परिसर रॅगिंगविरोधी जागृतीत आघाडीवर राहावा, सुरक्षित व स्नेहपूर्ण वातावरणात विद्यार्थी घडावेत, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.