https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

अमरनाथच्या गुहेतून…* भाग १३ लेखक: धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर

नांदेड:

रोजच्या सवयी प्रमाणे रात्री कितीही वाजता झोपलो तरी अलार्म न लावता मला सकाळी पाच वाजता बरोबर जाग येते. पाच च्या आधी जर उठायचे असेल तर मनाला दोन-तीनदा सूचना दिली की, योग्य वेळी आपोआप जाग येते.पण रात्री गाढ झोपेत असताना मोबाईल वाजला. अर्धवट झोपेतच मोबाईल उचलला. ओमप्रकाश पाम्पटवार यांचा फोन होता. फोनवरचे त्यांचे बोलणे ऐकून एका क्षणात झोपेची गुंगी उतरली. “भाऊ आपली ट्रेन कॅन्सल झाली ” घड्याळात पाहिले तर ३.३५ वाजले होते. काही वर्षांपूर्वी असेच झाले होते. संपूर्ण यात्रा पूर्ण करून अमृतसर हून परतीच्या प्रवासाला निघणार तर पावसामुळे सर्व वाहतूक व्यवस्था बंद झाली होती. तब्बल सहा दिवस आम्हाला अमृतसर मध्ये अडकून रहावे लागले होते. त्यामुळे यावेळी असे काही होऊ नये,अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली.

सर्वात आधी काल अमृतसरमध्ये ज्या ट्रॅव्हल्सच्या बसेस आम्ही घेतल्या होत्या त्या संधू ट्रॅव्हल्सच्या सरदार वरणदीपसिंघ यांना फोन लावला. पाच-सहा वेळा लावल्यानंतर त्यांनी उचलला. पहिल्यांदा त्यांची माफी मागितली व माझी अडचण सांगितली. दिल्लीला जाणाऱ्या सर्व ट्रेन कॅन्सल झाल्यामुळे व रात्री ११ वाजता दिल्लीहून आम्हाला श्रीगंगानगर एक्सप्रेस ने नांदेड ला जायचे असल्यामुळे कसेही करून दोन बसेसची व्यवस्था करण्याची सूचना केली. सकाळी दहा वाजेपर्यंत बसेस देतो असे त्यांनी सांगितले. मी त्यांना विनंती केली की , किमान सातला तरी आम्हाला निघावे लागेल. बघतो काय होते ते? असे सांगून त्यांनी फोन ठेवला.

माझ्यासोबत झोपलेल्या अमोल गोले या टूर मॅनेजरला उठवले. ग्रुपमध्ये मेसेज टाकला की, आपली ट्रेन रद्द झालेली आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कोणीही हॉटेल सोडू नये. मदतीसाठी सदैव तत्पर असणारे संघांचे स्वयंसेवक अभय शृंगारपुरे यांचा फोन आला भाऊ काही काम असेल तर सांगा. मी त्यांना रूममध्ये बोलवले. तेवढ्यात ट्रॅव्हल्सवाल्यांचा फोन आला व त्यांनी सांगितले की, अमृतसर दिल्ली मार्गावर दोन ठिकाणी प्रचंड पावसामुळे पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे. आता फक्त एकच उपाय होता तो म्हणजे विमानाने जाण्याचा. आमच्या रूममध्ये बरेच यात्री जमा झाले होते. अभय शृंगारपुरे व अमोल गोले यांना रेल्वे तिकीट कॅन्सल करण्यासाठी स्टेशनवर पाठवले.दिल्लीच्या सर्वच ट्रेन रद्द झाल्यामुळे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली होती. कोणतेही अधिकारी उपलब्ध नव्हते. सात वाजता रिफंडचे काउंटर सुरू होणार अशा सूचना मिळाल्या.

दिल्ली दर्शनासाठी दोन बसेस आधीच बुक केलेल्या होत्या. तसेच दुपारच्या दिल्लीच्या भोजनासाठी देखील ऍडव्हान्स पेमेंट केले होते. त्यांना फोन लावला असता आता ऑर्डर कॅन्सल करता येत नाही असे सांगितले. खरे तर मनात आणले तर पुरेसा वेळ असल्यामुळे ते ऑर्डर कॅन्सल करू शकले असते पण दिल्ली वाले तो दिल्ली वाले होते है… जास्त बोलून काय फायदा नव्हता. रेल्वे व रस्ता बंद असल्यामुळे विमानाचे तिकिटे तरी भेटतात काय?याची चौकशी चालू होती. टीव्हीवर उत्तर भारतात सर्वत्र पावसाचा धुमाकूळ सुरू असल्याच्या बातम्या चालू होत्या. दिल्लीमध्ये सुद्धा यमुनेचा जलस्तर वाढत असल्याची बातमी पाहून विमानाने दिल्लीला जाण्यापेक्षा हैदराबाद, संभाजीनगर, पुणे, मुंबई ला जाणे योग्य होईल यावर सगळ्यांचे एकमत झाले. क्षणाक्षणाला विमानाचे दर वाढत होते. आपापल्या परीने विमान तिकीट बुक करण्याचा सर्वांना सल्ला दिला. दिगंबर शेंदुरवाडकर यांच्या मुलाने काहीजणांचे अमृतसर ते हैदराबाद ऑनलाइन विमानाचे तिकिटे काढून दिली. गजानन मामीडवार यांनी काहींची पुण्याची तिकिटे काढली. सुधाकर ब्रम्हनाथकर यांनी मुंबईची तिकिटे काढली.काही जणांनी असे सांगितले की, भाऊ तुम्ही जसे जाल तसे आम्ही येऊ. तेव्हा मी त्यांना सांगितले की सर्वांची व्यवस्था झाल्यानंतरच मी अमृतसर सोडेल.

तेवढ्यात शृंगारपुरे कॅप्टन यांचा फोन आला. एक रेल्वे वेगळ्या मार्गाने दिल्लीला सोडण्यात येणार आहे, जी रात्री साडेआठला दिल्लीला पोहोचेल. पण फक्त १८ तिकिटे शिल्लक आहेत. ग्रुपमध्ये सूचना दिल्या की, कोणी रिस्क घेऊन ट्रेन ने जात असेल तर जाऊ शकता ? १८ च्या ऐवजी २६ जण तयार झाले.शंकर वंगलवार ,संजय जाधव,माधव मस्‍कले,तुकाराम गायकर,नंदिनी गायकर ,साहिल गायकर,क्षितिज गायकर, अरविंद चौधरी,अंजली चौधरी,बसवराज कुसनुरे,प्रतिभा कुसनुरे,मीना कुलकर्णी,जयवंत पांडागळे,अनिता पंचलिंग ,तिरुपती गुट्टे,अनुसया गुट्टे,कालिदास निरणे,सीमा निरणे,संतोष चेनगे,शिवप्रभू कामजळगे,शंकर देशमुख,सुरेश दलबसवार,सुनंदा यन्नावार,अशोक जैस्वाल,संध्या जैस्वाल, सृष्टी जैस्वाल हे स्वतःचा रिस्कवर दिल्लीला रेल्वेने जाण्यास तयार झाले. काहींनी ऑनलाइन तिकिटे काढली.पूर्व नियोजित कार्यक्रमाप्रमाणे राहुल झंवर, संगीता व जयप्रकाश नावंदर हे रात्रीच विमानाने संभाजीनगरला पोहोचल्या असल्यामुळे ते नशीबवान ठरले.
रेखा व विशाल राठी,सारिका व विशाल मंत्री, स्वाती व ब्रिजकिशोर दरक या सहा जणांनी इनोवा ने दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. विमानाची तिकिटे ज्यांची बुक झाली होती.त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत .अनघा व अभय शृंगारपुरे,सुभाष देवकते,सुषमा व मुकेशसिंह तौर,अरुणा चौहान,प्रियंका व
गजानन मामीडवार,जयश्री व गंगाधर फलटणकर, पल्लवी व शशिकांत कुलकर्णी, शुभांगी व श्रीकांत कुलकर्णी,माधुरी व प्रदीप
राहेगावकर,विजयालक्ष्मी व ओमप्रकाश पाम्पटवार,तेजश्री व दिगंबर शेंदुरवाडकर,
शुभदा व श्याम रावके,रुपाली व बालाजी कवानकर,सुनीता व बालाजी लाठकर,मनोरमा व अरुण लाठकर,सुनीता व सुधाकर ब्रह्मनाथकर,शैला व वैजनाथ तसेच वरद पत्तेवार. सर्वांची व्यवस्था झाली हे पाहून माझे व माझा सहकारी अमोल गोले चे रात्री ११ चे दिल्ली मार्गे पुण्याची विमान तिकिटे काढली. अमरनाथ चा सर्व प्रवास सुखरूप पार पडल्यानंतर शेवटच्या टप्प्यात निसर्गाने रौद्र रूप धारण केल्यामुळे अमरनाथ यात्रा ही किती कठीण आहे याची प्रचिती पुन्हा एकदा आली. परतीचा प्रवास हा सर्व अनिश्चितेचा खेळ असल्यामुळे जे काही शक्य असेल ते करून पुढचे सर्वकाही परमेश्वरावर सोडून दिले.
( क्रमशः )

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704