https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

अमरनाथच्या गुहेतून.. भाग १२ लेखक: धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर

नांदेड:

इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे शिखांचे चौथे गुरू गुरुरामदास यांनी सन १५७७ मध्ये अमृतसर ची स्थापना केली. येथील गुरुद्वाराच्या आजूबाजूला जे सरोवर गुरुरामदास निर्मित आहेत त्या सरोवराचे नाव त्यांनी अमृतसर असे ठेवले.संपूर्ण अमृतसर शहराची रचना ही या गुरुद्वाराच्या आजूबाजूला गोलाकारामध्ये झाली आहे. १९व्या शतकाच्या आरंभापर्यंत हे शहर ब्रिटिश शासनाच्या अंतर्गत होते.
शिखांचे पाचवे गुरु अर्जुनदेव यांनी या अमृतसरोवराच्या मध्यभागी १६०४ ला हरमंदिर साहेब निर्माण केले.गोल्डन टेम्पल हे नाव त्याला ब्रिटिशांनी दिलेले आहे. रावी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहराचा इतिहास मोठाच स्फूर्तीदायक आणि भारतीय स्वातंत्र्य युद्धात मोठे योगदान देणारा आहे.अमृतसर हे जिल्ह्याचे ठिकाण असून एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक धार्मिक आणि आर्थिक केंद्र आहे. शीख बांधवांसाठी हे सर्वात पवित्र शहर आहे. पौराणिक मान्यतेप्रमाणे रामायण काळात अमृतसर हे एक घनदाट जंगल स्वरूपात होते.जेथे प्रभू श्रीरामाचे दोन्ही पुत्र यांनी वास्तव्य केले होते.

सकाळी भरपेट नाश्ता हॉटेलवरच करून आम्ही सर्व दोन एसी बसने अमृतसर दर्शनासाठी निघालो.सर्वप्रथम जालियनवाला बाग ला भेट दिली.भारतीय इतिहासातील अत्यंत कलंकित घटना ज्या ठिकाणी घडली ते ठिकाण म्हणजे जालियनवाला बाग. भारतीय स्वातंत्र्य युद्धाला जालियनवाला बाग हत्याकांडामुळे फार मोठी कलाटणी मिळाली.१३ एप्रिल १९१९ या दिवशी जालियनवाला बागेत हजारो नि:शस्त्र लोकांवर ब्रिटिश अधिकारी जनरल डायर व त्याच्या सहकाऱ्यांनी बंदुकीच्या गोळ्यांची बरसात केली. या हत्याकांडात हजार पेक्षा जास्त लोक मारले गेले. बागेत असलेल्या विहिरीत अनेकांनी जीव वाचवण्यासाठी उड्या टाकल्या पण ते देखील वाचू शकले नाही.या ठिकाणी पाच गॅलरी मध्ये फोटो आणि दृकश्राव्याच्या माध्यमातून हा सर्व इतिहास तुमच्यासमोर उलगडला जातो. या हत्याकांडात बलिदान दिलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या स्मृतीसाठी जालियनवाला बागेत एक स्मृतीस्तंभ उभारला गेला आहे.त्यावर अखंड ठेवत राहणारी ज्योत अमरज्योतीच्या स्वरूपात ठेवण्यात आलेली आहे. सरदार उधमसिंग यांनी या हत्याकांडास कारणीभूत ठरलेल्या गव्हर्नर जनरल मायकल ओडवायर याचा लंडनमध्ये जाऊन गोळी मारून हत्या करत बदला घेतला. त्यानंतर हसत हसत ते फासावर चढले. त्यांच्या स्मृतिपित्यर्थ उत्तराखंड मधील एका शहराचे नाव उधमसिंहनगर असे ठेवण्यात आलेले आहे.भारतीय स्वातंत्र्य युद्धात बलिदान देणाऱ्या पंजाब मधील क्रांतिकारकांची स्मृती देखील फोटोच्या स्वरूपात जालियनवाला बाग येथे दर्शक दीर्घे मध्ये जतन करण्यात आली आहे. हे सर्व फोटो पहात असताना भारतीयांची मने या बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांसाठी उचंबळून येतात. आपोआप आपण त्यांच्याप्रती नतमस्तक होतो.

त्यानंतर पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या स्वर्णमंदिरात पुढील व्यवस्थेसाठी मी आधी गेलो. त्या ठिकाणी माझे पत्रकार मित्र सरदार चरणजितसिंघ अरोरा यांना पूर्व सूचना दिल्यामुळे ते येऊन थांबले होते. त्यांनी मला पगडी बांधली. मी इन्फॉर्मेशन ऑफिसच्या बाहेर उभा राहिलो. आमचे एक एक यात्रेकरू येत होते. पण एकानेही मला ओळखले नाही. त्यानंतर मी जेव्हा नांदेडचे सगळे आले का? असे विचारले. तेव्हा कुठे त्यांना मला ओळखता आले. आमच्यापैकी प्रमुख लोकांचा धार्मिक पुस्तके देऊन गुरुद्वारा तर्फे सत्कार करण्यात आला. आम्ही देखील शिरोपाव व ट्रॉफी देऊन सर्वांचा सन्मान केला. चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर अमृतपालसिंघ यांनी शीख धर्माची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर आम्ही ग्रुप फोटो काढला. दर्शनासाठी विशेष व्यवस्था केल्यामुळे प्रचंड गर्दीत देखील आम्हाला जास्त वेळ लागला नाही. मथ्था टेकला आणि प्रसाद ग्रहण करून बाहेर आलो.

सुवर्ण मंदिराची प्रतिकृती असलेल्या दुर्गायनी मंदिराच्या दर्शनासाठी गेलो असता ते बंद होते. त्यानंतर मॉडल टाउन येथील लाल माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले.१२० वर्षाची परंपरा असलेल्या कुलवंतसिंघ कुलचेवाले यांच्या हॉटेलमधून दुपारचे जेवण पार्सल मागवले होते. कुलचे, कश्मीरी पुलाव आणि राजभोग मिठाईची चव अप्रतिम होती. आमच्यासोबत असणाऱ्या गंगाधर फलटणकर,सुधाकर ब्रम्हनाथकर,रेखा देशपांडे, श्रीकांत कुलकर्णी यांच्यातर्फे ही व्यवस्था करण्यात आली होती.

सायंकाळी साडेचार च्या सुमारास आम्ही अटारी वाघा बॉर्डर ला पोहोचलो. गोल्डन टेम्पल मधून आमच्या नावाची शिफारस करण्यात आली असल्यामुळे प्रचंड गर्दी असलेल्या स्टेडियममध्ये पुढची जागा मिळाली. हिंदुस्तान पाकिस्तान च्या सैनिका तर्फे करण्यात आलेल्या संयुक्त संचालनाच्या वेळी दोन्ही बाजूंनी जोरजोरात घोषणा देण्यात येत होत्या. डोळ्याची पारणे फिटणारी ही कवायत पाहून अंगात वीरश्री निर्माण झाली. आमचा सर्व ग्रुप अमरनाथ यात्री संघाचे टी-शर्ट घालून एकत्रित बसला असल्यामुळे उठून दिसत होता. भारत माता की जय, हिंदुस्तान जिंदाबाद यासारख्या घोषणा बुलंद आवाजात देण्यात येत होत्या. मी मग जय भवानी जय शिवाजी, बम बम भोले , जोर से बोलो जय मातादी च्या घोषणा दिल्या. सर्वांचा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून मोदी मोदी च्या दिलेल्या घोषणांना देखील सर्वांनी दाद दिली. कडक उन्हात दोन तास कधी संपले हे कळाले देखील नाही.

परतीच्या प्रवासात अरोरा मंगल कार्यालयात आमच्या सर्वांची एखाद्या रिसेप्शन प्रमाणे जेवणाची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे सरदार जागीरसिंघ यांच्यातर्फे करण्यात आली होती. त्यांचे आदरतीथ्य पाहून सर्वजण भारावून गेले. यावेळी १३ दिवसाच्या कालावधीत जाणवलेल्या यात्रेकरुंच्या स्वभावावरून त्यांना वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सकाळी गोल्डन टेम्पल येथे घेतलेल्या फोटोची एक एक प्रत माझ्यातर्फे प्रत्येकाला दिली. रात्री नऊच्या सुमारास आम्ही हॉटेलला परतलो. सकाळी चार वाजता तयार होण्याच्या सूचना देऊन मी निद्रादेवीच्या कुशीत गेलो.
(क्रमशः)

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704