ताज्या घडामोडी

फोंडाघाट महाविद्यालयाचा 30 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

फोंडाघाट प्रतिनिधी :
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचा ३० वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास संस्थेचे चेअरमन श्री. महेश सावंत, संचालक श्री. दत्तात्रय पवार, प्राचार्य डॉ. पुरंधर नारे, तसेच डॉ. अमेय मराठे, डॉ. प्राजक्ता तेली, श्री. विजय नांदोडकर, श्री. आशिष कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर डॉ. सतीश कामत यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजवर झालेल्या प्रगतीचा आढावा प्रास्ताविकातून मांडला. विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी म्हणून काशी सावंत हिने आपल्या मनोगतात महाविद्यालयाबद्दल गौरवोद्गार काढले.

या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एनएसएस विभागाच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबविले. जीवनआनंद संस्था संचलित स्नेहसिंधू निराधार आश्रम, फोंडाघाट येथील रहिवाशांना जुन्या पण उत्तम स्थितीतील कपड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या सहकार्याने आजी-माजी विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी मोफत दंत चिकित्सा शिबिर घेण्यात आले.

आपल्या भाषणात प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले की, “या महाविद्यालयातून आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थी देश-विदेशातील विविध क्षेत्रांत उच्च पदावर विराजमान झाले आहेत. आगामी काळात ‘कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम’च्या माध्यमातून अधिक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातील. तसेच विद्यार्थ्यांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी यासाठी महाविद्यालयाच्या वतीने ‘जॉब फेअर’चे आयोजन करण्याचा मानस आहे.”

माजी विद्यार्थी श्री. विजय नांदोडकर यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल अभिमान व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.संचालक श्री. दत्तात्रय पवार यांनी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण घेऊन मोठे होण्याचे, तसेच आपल्या शाळा-महाविद्यालयाच्या प्रगतीस हातभार लावण्याचे आवाहन केले.

श्री. आशिष कांबळी (स्नेहसिंधू निराधार आश्रम) यांनी महाविद्यालयाने समाजोपयोगी उपक्रमांमध्ये दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात संस्थेचे चेअरमन श्री. महेश सावंत म्हणाले की, “फोंडाघाट महाविद्यालयाने स्थापनेपासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून प्रगती साधली आहे. महाविद्यालयाचा शिक्षकवर्ग हा अनुभवी व तज्ज्ञ असून विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच विज्ञानवादी दृष्टिकोन अंगीकारून समाजासाठी उपयुक्त असे घडावे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल जाईल हिने केले, तर आभारप्रदर्शन डॉ. बालाजी सुरवसे यांनी मानले. या सोहळ्यास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. शेवटी उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या वतीने रिफ्रेशमेंटची व्यवस्था करण्यात आली.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.