ताज्या घडामोडी

आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करणार : पालकमंत्री अतुल सावे

बचाव व मदतकार्य वेगाने करण्याच्या सूचना

नांदेड शहरासह जिल्ह्यातील नुकसानीची केली पाहणी

नांदेड दि. 30 ऑगस्ट :- नांदेड शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आहे. यामुळे नांदेड शहरासह तालुक्यातील अनेक गावात पुरपरिस्थिती निर्माण होवून नागरिक पाण्यात अडकले होते. जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने आर्मी, एसडीआरएफ टीम व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मदत व बचाव कार्य वेगाने करुन नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्तांना मदत व त्यांच्या पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. नांदेड शहरात व जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त गावांना भेट देवून त्यांनी आज नुकसानीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

आज सकाळी पालकमंत्री श्री. सावे यांनी नांदेड शहरातील श्रावस्तीनगर, विष्णुनगर भागात भेट देवून त्या भागाची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधून त्यांना मदत व बचावकार्य तातडीने करण्यात येईल असे सांगितले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, तर तालुक्याच्या ठिकाणी आमदार जितेश अंतापूरकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

नांदेड शहरात काल सकाळी अतिवृष्टीग्रस्त पाऊस झाला यामुळे शहरातील सखल भाग असलेल्या नगरातील घरामध्ये पाणी साचले. प्रशासनाच्या तत्परतेमुळे एनडीआरएफच्या टीम व प्रशासनाच्या टीमच्या मदतीने नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. त्यांना तात्पुरते निवारे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आज नांदेड शहरात पुराचे पाणी साचलेल्या श्रावस्तीनगर, विष्णुनगर या भागाची पाहणी पालकमंत्री अतुल सावे यांनी केली. त्यानंतर त्यांनी नायगाव, उमरी, बिलोली, धर्माबाद, कंधार तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन तेथील नागरिकांशी संवाद साधला. शासन सदैव तुमच्या पाठीशी असून मदत व बचावकार्य तत्परतेने करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन अहवाल शासनास सादर करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

पालकमंत्री अतुल सावे यांनी शहरातील पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर तालुक्यातील तुप्पा, कहाळा, बरबडा, नायगाव, बिलोली, कुंडलवाडी, हुनगुंदा, भूकमारी, गुंडा, कौठा, काटकळंबा, उस्माननगर या गावांना भेट देवून नुकसानीची पाहणी केली व तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच प्रशासनाला तातडीच्या मदतकार्याबाबत सूचना दिल्या. या कठीण परिस्थिती शासन खंबीरपणे आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी उभे आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नुकसान झालेल्या पिकांची, रस्त्यांची, घराच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन पालकमंत्री अतुल सावे यांनी शेतकऱ्यांचे, नागरिकांचे निवेदने स्वीकारले.
00000

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.