सामाजिक परिवर्तन हेच अण्णाभाऊंच्या साहित्यातील तत्त्वज्ञान – प्रा. शरद वाघमारे

नांदेड – “अण्णाभाऊ साठे यांनी माणूस केंद्रबिंदू मानून साहित्यनिर्मिती केली. शोषित, कष्टकरी, वंचित आणि दडपल्या गेलेल्या समाजघटकांच्या व्यथा-वेदनांचे जिवंत चित्र त्यांच्या साहित्यामधून दिसते. साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याची जाणीव ठेवून त्यांनी लेखन केले. त्यांच्या साहित्यातील तत्त्वज्ञान म्हणजे सामाजिक न्यायाचा मार्ग,” असे प्रतिपादन प्रा. शरद वाघमारे यांनी केले.
शहरातील तरोडा (बु) भागातील धनश्री कॉलनी येथे आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी लोकस्वराज्य आंदोलन कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पवार होते.
प्रमुख उपस्थितीत पत्रकार अनिल कसबे, मंगेश कदम, डॉ. भगवान सूर्यवंशी, विकास देशमुख, मुख्याधिकारी नीलम कांबळे, विस्तार अधिकारी कैलास गायकवाड, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष सूर्यवंशी, साहित्यिक नागोराव नामेवार आदींचा समावेश होता. प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार भारत दाढेल व प्रा. शरद वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
पत्रकार भारत दाढेल यांनी अण्णाभाऊ साठे यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान विषद करताना अण्णाभाऊंच्या मराठी हिंदी आणि बंगाली चित्रपटातील कामगिरी स्पष्ट केली. हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांचे वर्चस्व होते अनेक दिग्गज कलावंतांसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन हे त्यांनी केले असून अभिनेत्री नर्गिस यांनाही त्यांनी अभिनयाचे धडे दिले होते. असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश बनकर यांनी केले, तर आभार निवृत्त मुख्याध्यापक के. एम. थोरात यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळ अध्यक्ष नागोराव कुडके, पत्रकार दीपक बार्हाळीकर, गंगाधर डोपे, नागोराव गुंडेकर, राहुल गायकवाड, सुभाष खिल्लारे, अमोल कौठैकर आदींनी परिश्रम घेतले.