ताज्या घडामोडी

साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांनी मानवी मूल्यांची पेरणी केली -डॉ.प्रकाश सूर्यवंशी

*
नांदेड(दि.२ ऑगस्ट २०२५):
साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात स्त्रीवादाचा प्रभावी आणि प्रखरपणे पुरस्कार केला. उपेक्षित वंचित स्त्रियांना आपल्या कादंबरीत मुख्य पात्र देणारे अण्णाभाऊ साठे साहित्य क्षेत्रातील पहिलेच कादंबरीकार ठरतात. त्यांनी आपल्या साहित्यात चारित्र्यसंपन्न, साहसी आणि संकटाचा सामना करणाऱ्या निर्भीड नायिका उभ्या केल्या. स्त्री ही संपूर्ण विश्वाची जननी आहे; तिच्या अस्तित्वाशिवाय मानवी जीवन अशक्य आणि अधुरे आहे. प्रस्थापित साहित्याने स्त्रियांचे भावनिक प्रश्न आणि मूलभूत समस्याकडे कानाडोळाच केला होता. अण्णाभाऊ साठे ५० हून अधिक चारित्र्यसंपन्न आणि निर्भीड नायिकाप्रधान साहित्य रचना लिहून त्या घरंदाज लेकींचे बाप झाले. ही त्यांच्या साहित्य लेखनाची फार मोठी उपलब्धि आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत भरडल्या जाणाऱ्या स्त्रियांचे शोषण आणि या शोषणाविरुद्ध बंड आणि विद्रोह करणाऱ्या स्त्रियांचे चित्रण अण्णाभाऊंच्या समग्र साहित्यामध्ये प्रतिबिंबित झाले आहे, असे प्रतिपादन स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय, पूर्णा येथील डॉ.प्रकाश सूर्यवंशी यांनी केले.
यशवंत महाविद्यालयात माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार यशवंत प्रबोधन व्याख्यानमालेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील आधुनिक मूल्य’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
पुढे बोलताना डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, अण्णाभाऊंनी पृथ्वी कुठल्या शेषनागाच्या मस्तकावर नसून ती कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे, असे सांगून धर्मव्यवस्थेला आव्हान देत
नवा विज्ञानवाद मांडला. समाजातील अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, रूढी परंपरा नष्ट झाल्या पाहिजेत त्यासाठी नवसमाज निर्माण झाला पाहिजे, यासाठी सातत्याने लेखन केले. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील पात्रे मानवतावादी मूल्य जपणारी आहेत. शोषित, कष्टकरी, वंचित, आणि बहुजनांच्या परिवर्तनासाठी अण्णाभाऊ साठे यांनी लेखणी झिजवली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे होत्या. याप्रसंगी विचारपीठावर उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, व्याख्यानमाला समन्वयक डॉ. संदीप पाईकराव उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात डॉ. कविता सोनकांबळे यांनी, विद्यार्थ्यांना आवाहन केले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य ही केवळ वाचनाची वस्तू नसून ती एक प्रेरणा आहे. त्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांचे तत्त्वज्ञान आहे. विद्यार्थ्यांनी अशा साहित्याचा अभ्यास करून सामाजिक भान बाळगावे आणि आपल्या कार्याने समाजहिताचा विचार करावा.
प्रारंभी प्रास्ताविकात डॉ.संदीप पाईकराव यांनी, व्याख्यानमालांच्या आयोजनामागील उद्देश विशद करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सामाजिक भान, विचारशीलता आणि संवेदनशीलतेचा विकास घडविणे; हे यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला समितीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच नव्हे; तर मूल्यसंवर्धनही देऊ शकतो.
सूत्रसंचालन डॉ.मीरा फड यांनी केले, तर आभार डॉ.डी.ए.पुपलवाड यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य डॉ. गौतम दुथडे, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, डॉ. साईनाथ शाहू, डॉ.राज सोनटक्के, प्रा. शांतूलाल मावसकर, डॉ.साईनाथ बिंदगे आणि माजी अधिष्ठाता डॉ.अजय टेंगसे, डॉ.कविता केंद्रे, डॉ. नीताराणी जयस्वाल आदींनी परिश्रम घेतले आणि प्रबंधक संदीप पाटील, डॉ.अजय गव्हाणे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रशांत मुंगल यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमास प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.