https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

स्वतःच्या ‘जीवनाचा अर्थ’ शोधणे ही प्राधान्याची गोष्ट असायला हवी!.अमृत अभय बंग यांचे प्रतिपादन

नांदेड : (दि.२८ जुलै,२०२३)
‘तरुण वय हे क्षमतांच्या दृष्टिकोनातून जसे सर्वोच्च असते तसेच त्या क्षमतांचा उपयोग नेमका कशासाठी आणि कुणासाठी करायचा हे ठरविण्यासाठी देखील सर्वोत्तम असते.यामुळेच तारुण्याच्या या काळात उपजीविकेची सोय करताना आपली जीविका नेमकी कोणती आहे, हे ठरवून स्वतःच्या जीवनाचा अर्थ शोधणे; ही प्रथम प्राधान्याची गोष्ट असायला हवी!’ असे प्रतिपादन श्री.अमृत अभय बंग यांनी ‘संवाद तरुणाईशी’ या कार्यक्रमात दि.२७ जुलै रोजी बोलताना केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभाग आणि यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व व्यक्तिमत्व विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या संवादाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे होते तर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
तरुणाईशी केलेल्या या मनमोकळ्या संवादात श्री.बंग पुढे म्हणाले की, ‘तरुण पिढी आपले आयुष्य दुसऱ्याच्या हाती सोपवून जगते आहे. आपल्या आयुष्याचा अर्थ स्वतः शोधण्याऐवजी आपले आई-वडील, मित्रपरिवार किंवा अन्य कुणीतरी तो आपल्यासाठी शोधायला हवा, अशा संभ्रमात ते अडकून पडले आहेत. अशावेळी ‘निर्माण’ हा गडचिरोली येथील तरुणाईला उभे करणारा प्रकल्प त्यांच्या आयुष्याचा अर्थ शोधण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. आपण कोण आहोत? याची उकल शोधण्याबरोबरच ‘आपण कोणासाठी आहोत?’ या प्रश्नाचा शोध घ्यायचा असेल तर तरुणाईने स्वतःला ‘निर्माण’ या प्रकल्पाशी जोडून घ्यायला हवे!’ हे त्यांनी विविध उदाहरणे देऊन प्रभावी पद्धतीने पटवून दिले.
डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी, विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून कशाप्रकारे कार्यरत आहे, हे सांगत तरुण पिढीसोबत संवाद करणारे असे उपक्रम मोठ्या प्रमाणावर व्हायला हवेत, असे आपल्या शुभेच्छापर मनोगतात सांगितले.
अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, विद्यार्थ्यांनी केवळ पदवी संपादन करणे हे आपले उद्दिष्ट न ठेवता त्याहीपेक्षा कौशल्य संपादनावर अधिक भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रगती परमेश्वर तेलंग यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय आशिष चव्हाण यांनी करून दिला. प्रस्तुत संवादाचे प्रास्ताविक व्यक्तिमत्व विकास विभागाचे समन्वयक डॉ.विश्वाधार देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ.बालाजी भोसले यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रबंधक श्री. संदीप पाटील,डॉ.एल.व्ही.पद्माराणी राव,डॉ.शिवराज बोकडे,डॉ.अजय गव्हाणे,डॉ.मीरा फड,डाॅ.रमेश चिल्लावार प्रा.डॉ.साईनाथ बिंदगे,प्रा.अविनाश गायकवाड यांच्यासह अनेक प्राध्यापकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार आणि गजानन पाटील यांनी सहकार्य केले.
दिवसभर पावसाची अखंड रीपरीप असताना देखील या संवादासाठी तरुणाईने तुडुंब गर्दी केली होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704