नांदेडमध्ये सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष; काँग्रेस तालुकाध्यक्ष निरंजन पावडे यांनी स्वखर्चाने दुरुस्त केला रस्ता, नागरिकांमध्ये समाधान

नांदेड: शहरातील गुरुजी चौक ते सिद्धिविनायक नगर या महत्त्वाच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली असून, जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, ड्रेनेज लाईन नसल्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्थानिक आमदार बालाजी कल्याणकर यांच्याकडे अनेकदा मागणी करूनही त्यांनी या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने अखेर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निरंजन पावडे यांनी स्वतःच्या खर्चाने या रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
मागील अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक लहान मुले याच रस्त्याने शाळेत जातात, त्यामुळे पालकांची चिंता वाढली होती. अनिल पावडे, शिवाजी पावडे, श्रीपत राठोड, विजय यन्नावार गजानन गोरे, गोविंद पावडे, नंदकिशोर देशमुख प्राध्यापक पस्तापुरे मा. पोलीस निरीक्षक पुरी, सहशिक्षक चौले, ओम धर्माधिकारी, लक्ष्मीकांत उत्तरवार, प्रा. डॉ. प्रवीण कुमार सेलूकर यांसारख्या स्थानिक नागरिकांनी वारंवार आमदार बालाजी कल्याणकर यांच्याकडे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निवेदन दिले होते. मात्र, त्यांच्या मागणीला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
आमदारांच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आपली व्यथा काँग्रेस तालुकाध्यक्ष निरंजन पावडे यांच्यासमोर मांडली. जनतेचा त्रास पाहून पावडे यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ स्वखर्चाने रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी योग्य बनवला. पावडे यांच्या या तत्पर आणि संवेदनशील कृतीमुळे नागरिकांमध्ये मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.