नेसुबो महाविद्यालयाचा शिवराज मुधोळ भारतात दुसरा. (आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचला – अमेरिकेतून मिळाल्या मेहंदीच्या ऑर्डर!

नांदेड:स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ अमिटी युनिव्हर्सिटी नोएडा (उत्तर प्रदेश) येथे संपन्न झालेल्या ‘अमिटी उत्सव’ या राष्ट्रीय युवक महोत्सवात सहभागी झाला होता.
या राष्ट्रीय युवक महोत्सवात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या शिवराज मुधोळ यांने मेहंदी या कलाप्रकारात 138 विद्यापीठाचा सहभाग असलेल्या या राष्ट्रीय युवक महोत्सवात देशभरातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या सादरीकरणात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे विद्यार्थी शिवराज मुधोळ आणि कु. आदिती केंद्रे यांनी जबरदस्त प्रभाव टाकत प्रथम क्रमांक पटकावला. या सादरीकरणात महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककला आणि परंपरांचा यांचा उत्कृष्ट संगम साधत अदिती केंद्रे या विद्यार्थिनीने बहारदार सादरीकरण केले.
विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांच्या नेतृत्वामध्ये संपन्न झालेल्या या राष्ट्रीय युवक महोत्सवात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. संदीप काळे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम नियोजन आणि प्रेरणा मिळाली.
मेहंदी कलेतील आपल्या अनोख्या कौशल्यामुळे शिवराज मुधोळ आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळखला जात आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये अमेरिकेतून त्याला विशेष मेहंदी डिझाईन्ससाठी ऑर्डर मिळाल्या, आणि त्यामुळे त्याची कला सातासमुद्रापार पोहोचली आहे. एका ग्रामीण भागातील कलाकाराने आपल्या मेहनतीने जगभरात नाव कमवावे, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. कला माणसाचे आयुष्य समृद्ध करु शकते हे शिवराज मुधोळ यांने सिद्ध केले आहे. गुजरातच्या गणपत विद्यापीठ, मेहसाणा येथे झालेल्या आंतरराज्यीय युवक महोत्सवात शिवराज मुधोळने उत्तम प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक मिळवला. त्यामुळे त्याची ‘अमिटी उत्सव’ या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. या संपूर्ण प्रवासात ललित कला विभागाचे प्रशिक्षक श्री. सिद्धार्थ नागठानकर यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. मेहंदी कलेतील शिवराजच्या सर्जनशीलतेला परीक्षकांकडून विशेष प्रशंसा मिळाली.
या यशाबद्दल अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. बालासाहेब पांडे, संस्थेच्या सचिव ॲड. वनिताताई जोशी, कोषाध्यक्ष मा. कैलाशचंद काला, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम, डॉ. मनीष देशपांडे, डॉ. संतोष कोटूरवार, डॉ. मीनाक्षी बांगर, डॉ. दत्ता बडूरे, डॉ.आनंद आष्टूरकर, प्रा. किरण वाघमारे आदींनी या दोन्ही गुणी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.