भविष्यातील पिढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता शिकणे आवश्यक–डॉ. शिवाजी भदरगे

नांदेड:( दि.७ मार्च २०२५)
प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षण अभियान योजनेअंतर्गत श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालय, नांदेड येथील हिंदी विभागाच्या वतीने ‘हिंदी सामग्री लेखन’ या अँड-ऑन कोर्सच्या अंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली “संहिता लिखाणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर येथील प्रा. डॉ. शिवाजी भदरगे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
प्रा. डॉ. शिवाजी भदरगे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) चे विविध पैलू स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व वेगाने वाढत आहे आणि ती विविध क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी बदल घडवत आहे. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगामुळे होणाऱ्या फायद्यांविषयी चर्चा करत भविष्यातील पिढीसाठी हे ज्ञान आत्मसात करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मक दृष्टीकोनातून स्वीकार केल्यास समाजाच्या विकासामध्ये ती महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असेही त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ तंत्रज्ञानापुरती मर्यादित नाही, तर शिक्षण, वैद्यकीय सेवा, विज्ञान, व्यवसाय, शेती आणि संचार यासारख्या अनेक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. त्यांनी उदाहरण देऊन समजावले की ऑनलाइन शिक्षण, डेटा विश्लेषण, संशोधन, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन यामध्ये AI कशा प्रकारे मदत करू शकते. त्यांनी विद्यार्थ्यांना या क्षेत्रात नवीन संशोधन आणि नवसंकल्पना करण्यासाठी प्रेरित केले आणि सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेचे सखोल ज्ञान घेतल्यास विद्यार्थी आपल्या कारकिर्दीत उत्तुंग यश मिळवू शकतात.
विशेष व्याख्यानाचे अध्यक्षपद हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पाईकराव यांनी भूषवले. त्यांनी, प्रा. डॉ. भदरगे यांच्या व्याख्यानाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना नवीन संशोधन आणि अन्वेषण करण्यास प्रवृत्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना या क्षेत्रात अधिक रस घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध अनुप्रयोगांची सखोल माहिती मिळवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील जाधव यांनी केले. त्यांनी प्रमुख वक्त्यांची ओळख करून देताना त्यांच्या संशोधनातील योगदानावर प्रकाश टाकला. शेवटी डॉ. साईनाथ शहू यांनी आभार प्रदर्शन करत या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगितेविषयी सखोल माहिती मिळाल्याचे सांगितले.
या विशेष व्याख्यानास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी अत्यंत उत्साहाने विषयाशी संबंधित माहिती मिळवली आणि प्रश्न विचारून आपली जिज्ञासा दर्शविली. संपूर्ण कार्यक्रम ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरला, ज्यामुळे विद्यार्थ्यांना नवीनतम तंत्रज्ञान व त्याच्या भविष्यातील संधींबाबत विस्तृत माहिती मिळाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ.एल. व्ही. पदमाराणी राव, डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, लेखा विभागातील अभय थेटे, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.