https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

स्वतःचे आणि समाजाचे आयुष्य सुंदर करण्यासाठी भाषा,साहित्य आणि संस्कृतीचा अभ्यास आवश्यक! डॉ.व्यंकटी पावडे यांचे प्रतिपादन

नांदेड : (दिनांक ०७ आॅगस्ट)

‘स्वार्थ, मत्सर, खोटारडेपणा यामुळे आपला भवताल अंधारून आलेला आहे.माणूस दिवसेंदिवस संवेदनाहीन होतो आहे परिणामी समाजाचे आरोग्य बिघडले आहे आणि यासाठी वैद्यकशास्त्र किंवा तंत्रशास्त्र यांच्याकडून अपेक्षा केली जात आहे; परंतु भवतालातील या कुरुपतेला बाजूला सारून स्वतःचे आणि समाजाचे आयुष्य सुंदर करायचे असेल तर मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या अभ्यासाकडे वळणे हा सर्वोत्तम पर्याय’ असल्याचे प्रतिपादन भाषा, साहित्य व संस्कृतीचे अभ्यासक डॉ.व्यंकटी पावडे यांनी केले.ते यशवंत महाविद्यालयात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘सत्रारंभ’ व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे ह्या होत्या.

मराठी साहित्यातील विविध उदाहरणे देत डॉ.पावडे पुढे म्हणाले की, ‘व्यक्ती म्हणून आपले आदर्श निवडण्यात आणि समाज म्हणून आपली प्राधान्ये निवडण्यात आपली गफलत होते आहे. परिणामी तरुण पिढी तत्त्वज्ञानाच्या व्यासंगात गुंतून जाण्याऐवजी तंत्रशरण बनते आहे. तरुणाईची ही शरणागतता थांबवायची असेल तर यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागाकडून ‘वाचन कट्ट्यासारखे’ जे उपक्रम घेतले जातात, ते सर्वार्थाने फलदायी ठरणारे आहेत. यामुळेच भाषा शिक्षणाकडे केवळ एक विषय म्हणून न पाहता व्यक्ती व समाजाचे चारित्र्य घडविण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय म्हणून पाहायला हवे,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्ष मार्गदर्शनात डॉ. कविता सोनकांबळे यांनी ‘भवतालातील प्रतिकूलतेमुळे हताश न होता सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे पाहायची सवय जडली तर समग्र जीवनामध्ये अमुलाग्र परिवर्तन घडू शकते. यामुळे विद्यार्थ्यांनी प्रश्नांकडे न पाहता प्रश्नांतून उद्भवणाऱ्या संधींकडे पाहायला हवे’, असे आवाहन केले.

डॉ.विश्वाधार देशमुख यांनी ‘भाषेचा शोध’ हा मानवी उत्क्रांती प्रक्रियेतील मध्यवर्ती टप्पा असून भाषा नसती तर संस्कृतीचा जन्म झाला नसता यामुळे सांस्कृतिक उत्क्रांतीसाठी भाषा आणि साहित्य या मूलभूत गरजा आहेत हे लक्षात घेऊन आपल्या शैक्षणिक धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी व्हायला हवी’ यावरती आपल्या मनोगतात भाष्य केले.

विभागप्रमुख डॉ.संजय जगताप यांनी मराठी विभागाच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेऊन हा विभाग विद्यार्थीकेंद्री उपक्रम राबविण्यात
कसा आघाडीवर आहे, याचा आढावा प्रास्ताविकात घेतला.

कार्यक्रमाच्या आरंभी नुकतेच दिवंगत झालेले मराठीतील महत्त्वाचे कवी पद्मश्री ना.धों. महानोर यांना श्रद्धांजली करण्यात आली.यानंतर बी.ए. आणि बी.एस्सी.च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चार भित्तीपत्रकांचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली मद्रेवार,पाहुण्यांचा परिचय प्रगती तेलंग तर आभार प्रदर्शन डॉ.शिवाजी सुर्यवंशी यांनी केले.

सत्रारंभ व्याख्यानाच्या यशस्वितेसाठी शुभम राठोड, निकिता गाडेकर,पूजा तोटेवाड,
मीनाक्षी कानोजी यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. प्रस्तुत कार्यक्रमासाठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704