https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सर्वंकष समाज परिवर्तनासाठी डॉ.पंजाबराव देशमुखांच्या विचार कार्याचे नित्यस्मरण आवश्यक!प्राचार्य डॉ.पी.एस.चंगोले

नांदेड :

‘भारतीय समाज हा स्थितीप्रिय आहे.परिणामी भविष्यमंथनापेक्षा भूतकाळाच्या स्मृतींमध्ये रममाण होणे आपल्या समाजाला आवडते; परंतु गतीने बदलणाऱ्या वर्तमानाचा आणि त्यातून आकाराला येणाऱ्या भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर चिकित्सेला चालना देणाऱ्या शिक्षणाला प्राधान्य द्यायला हवे. यामुळे अशा शिक्षणाचा बहुजन समाजाच्या हितासाठी सातत्यापूर्ण आग्रह धरणारे आणि सर्वंकष समाज परिवर्तनाचा ध्यास बाळगणारे युगदृष्टे लोकनेते डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या विचार कार्याचे स्मरण आवश्यक असल्याचे’ प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक आणि धनवटे नॅशनल महाविद्यालय,नागपूर येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.पी.एस. चंगोले यांनी केले.

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आणि डाॅ.पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त यशवंत महाविद्यालय, नांदेड आणि विज्ञान महाविद्यालय,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
कै.डाॅ.शंकररावजी चव्हाण लेक्चर सीरिज मधील ‘विशेष व्याख्यानात’ ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ. रावसाहेब शेंदारकर हे होते.

डॉ.चंगोले पुढे म्हणाले की ‘शंभर वर्षांपूर्वी शिक्षणासाठी कमालीचे प्रतिकूल वातावरण असताना आपली शेती गहाण टाकून त्यातून आलेल्या पैशातून भाऊसाहेब देशमुख यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले. आणि भारतामध्ये परतल्यानंतर बहुजन समाजाच्या उन्नतीचा ध्यास घेऊन एकीकडे शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे जाळे उभे केले तर दुसरीकडे शिक्षण, कृषी आणि अर्थ खात्याचे मंत्री म्हणून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत समाजाप्रतीचे आपले उत्तरदायित्व पार पाडले.’

‘एकीकडे घटना समितीचे सदस्य म्हणून त्यांनी संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान दिले तर दुसरीकडे स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून येथील शेतकरी समाजासाठी हरितक्रांतीची पायाभरणी केली.महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांपासून प्रेरणा घेऊन ईहवादी दृष्टीकोनातील आधुनिक समाज घडविण्यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील राहिले. अशा या युगदृष्ट्या लोकनेत्याचे तरुण पिढीने नित्यस्मरण केले पाहिजे’, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात डॉ.रावसाहेब शेंदारकर यांनी ‘शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख आणि
सिंचन महर्षी श्रद्धेय डॉ.शंकरराव चव्हाण या दोन्ही राष्ट्र पुरुषांच्या विचार कार्याचा वारसा पुढे चालविण्यासाठी तरुण पिढीने कार्यरत राहायला हवे’ असे आवाहन केले.

प्रस्तुत कार्यक्रमात यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख तथा ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ.जगदीश कदम यांची मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यक्त केलेल्या मनोगतात डॉ.जगदीश कदम यांनी संस्था तसेच महाविद्यालयाचे आभार मानून आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर येथील विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र ढोरे यांनी केले तर यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे यांनी आपल्या स्वागतपर मनोगतातून व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.

कै.डाॅ.शंकररावजी चव्हाण लेक्चर सीरीज च्या वतीने घेण्यात आलेल्या प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शिवाजी सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख डॉ.संजय जगताप यांनी केले.

प्रस्तु कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ.एच.एस.पतंगे,प्रबंधक श्री संदीप पाटील,लेक्चर सीरीजचे समन्वयक डॉ.विश्वाधार देशमुख तसेच भाषा प्रयोगशाळा सहाय्यक श्री.प्रशांत मुंगल व श्री बासीगमलू यांनी परिश्रम घेतले.

हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने घेतलेल्या या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी डॉ.अजय गव्हाणे, डॉ.विजय भोसले,डॉ.संभाजी वर्ताळे,डॉ.सुभाष जुन्ने,प्रा.कैलास दाड, प्रा.मधुकर वाघ यांच्यासह अनेक प्राध्यापक तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704