https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

स्वारातीम’ विद्यापीठाने परीक्षेमध्ये नक्कल करणाऱ्या १७२० कॉपी बहाद्दरांना केली कडक शिक्षा

विद्यार्थाने उत्तरपत्रिकेमध्ये ‘मला पास करा’ लिहून चिकटविल्या पाचशे रुपयांच्या कडक नोटा

नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२३ परीक्षेमध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या आदेशानुसार कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात आलेली आहे. चार विद्याशाखेमध्ये एकूण १७२० विद्यार्थ्यांवर सर्व संपादणूक रद्द (डब्लूपीसी-व्होल परफॉर्मन्स कॅन्सल) अशी कडक शिक्षा करण्यात आली आहे. बी.सी.ए. प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षेमध्ये एका विद्यार्थ्याने तर त्याच्या सातही पेपरच्या उत्तर पत्रिकेमध्ये चक्क पाचशे रुपयांच्या नोटा चिकटवुन ‘मला पास करा’ असे लिहून उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाकडे सादर केल्या आहेत.

विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२३ परीक्षांमध्ये कॉपी करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये मानव्य विद्याशाखेतील ४८८ विद्यार्थी, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेतील २७८ विद्यार्थी, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील ३३९ आणि आंतरविद्याशाखेतील ६१५ असे एकूण १७२० विद्यार्थ्यांची सर्व संपादणूक रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजेच यावर्षी अथवा या सेमिस्टरमध्ये देण्यात आलेल्या सर्व परीक्षांचा निकाल हा शून्य करण्यात येतो. यामधील दोन विद्यार्थ्यांचा निकाल हा राखीव (आरटीडी-रिझल्ट टू बी डिक्लेअर्ड) ठेवण्यात आला आहे. गैरवर्तणूक केलेल्यापैकी तीन विद्यार्थ्यांना सर्व संपादणूक रद्द आणि अधिक चार परीक्षेसाठी बंदी अशीही कडक शिक्षा करण्यात आलेली आहे.

नांदेड येथील एका विद्यार्थ्याने बी.सी.ए. प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षेमध्ये त्याच्या सातही पेपरच्या उत्तर पत्रिकेमध्ये चक्क पाचशे रुपयांच्या कडक नोटा टिस्कोटेपद्वारे चिकटवून उत्तरपत्रिकेमध्ये ‘मला पास करा’ असे लिहून निमूटपणे सदर उत्तरपत्रिका परीक्षकांकडे सादर केल्या. नांदेड येथील मूल्यांकन केंद्रावर सदर बाब परीक्षकांच्या निर्देशनास आल्यानंतर त्या सातही उत्तरपत्रिका जशाच्या तशा सीलबंद करून विद्यापीठाकडे पाठविण्यात आल्या. सदर गैरवर्तुणकीचे प्रकरण महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम २०१६ अन्वये विद्यापीठाच्या गठीत ४८ (५) (अ) समितीपुढे चौकशीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. समितीने सदर गैरवर्तणूक प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित विद्यार्थ्यांची सर्व विषयाची संपादणूक रद्द करून त्यास पुढील एकूण चार परीक्षेसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. सदर रक्कम रुपये ३५००/- ही कुलगुरू फंडामध्ये जमा करण्यात आलेली आहे.

लातूर जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर बनावट प्रवेश परीक्षा प्रमाणपत्र तयार करून महाविद्यालयातील दुसऱ्याच तोतया विद्यार्थ्याने परीक्षा दिली. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी सदर बाब परीक्षा केंद्राच्या लक्षात आली. संबंधित परीक्षा केंद्राने हे प्रकरण विद्यापीठाच्या निर्देशनास आणून दिले. त्यानुसार गठीत समितीपुढे चौकशीसाठी ठेवण्यात आले. समितीने खऱ्या आणि तोतया अशा दोन्हीही परीक्षार्थ्यांना बोलावून कसून चौकशी केली. चौकशी अंती दोघांनीही गुन्हा काबुल केला. या बाबत दोघांचेही उन्हाळी-२०२३ परीक्षेतील संपादणूक रद्द करून त्यांच्यावर पुढील चार परीक्षेसाठी बंदी घालण्यात आलेली आहे.

विद्यापीठातर्फे अशी कडक शिक्षा देण्यासंबंधी मागील दहा वर्षातील पहिलीच घटना आहे. सदर कार्यवाहीमुळे विद्यार्थ्यावर वचक बसला असून भविष्यामध्ये कोणताही विद्यार्थी परीक्षेत गैरवर्तवणूक करण्याचे धाडस करणार नाही. भविष्यात अशा प्रकारच्या नक्कल बहाद्दरांवर आणखीनच कठोरात कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाद्वारे विशेष पथक नेमण्यात येणार आहे. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी कळविले आहे.

—————————–

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704