हैदराबाद मुक्ती संग्रामातील एक निष्ठावंत सैनिक डॉ.शंकरराव चव्हाण: ऐतिहासिक दस्तऐवज

नांदेड:
हैदराबाद मुक्ती संग्रामातील एक निष्ठावंत सैनिक डॉ.शंकरराव चव्हाण: ऐतिहासिक दस्तऐवज
प्रा.राजश्री भोपाळे लिखित ‘हैदराबाद मुक्तिसंग्रामातील एक निष्ठावंत सैनिक डॉ.शंकरराव चव्हाण’ हा ग्रंथ ऐतिहासिक, वाचनीय व संग्राह्य आहे. या ग्रंथाचे लेखन हैदराबाद प्रांताची निर्मिती, निजामकालीन हैदराबाद संस्थान, हैदराबाद मुक्तिसंग्राम व संस्थानाची निर्मिती, शंकराव चव्हाण यांचे हैदराबाद मुक्तिसंग्रामातील योगदान आणि शंकरराव चव्हाण यांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण या पाच प्रकरणात केले असून लेखिकेने सविस्तर व विस्तृत माहिती मांडलेली आहे.
हैदराबाद प्रांताच्या निर्मितीविषयी इसवी सन व संदर्भासहित केलेली मांडणी केवळ प्रमाणबद्धच नाही तर लेखिकेने ती रंजक पद्धतीने लिहिलेली आहे. ही लेखिकेची शैली संपूर्ण ग्रंथाचे वाचन करताना वाचकास पुन्हा पुन्हा प्रत्ययास येते. मुख्य म्हणजे पहिला निजाम ते सातव्या निजामाच्या संपूर्ण नावासकट कार्यकाल इसवी सन नमूद केलेले आहे व प्रत्येक निजामाचा स्वभाव, कार्यप्रणाली, छंद व विध्वंसक कार्य या विषयीच्या उल्लेखामुळे या ग्रंथास संदर्भ ग्रंथाचे स्वरूप प्राप्त होते.
निजाम काळातील हैदराबाद संस्थानाविषयी लेखन करताना आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक स्थितीचे केलेले सूक्ष्म वर्णन प्रसंशनीय आहे.
हैदराबाद मुक्तिसंग्राम आणि संस्थानाची निर्मिती या प्रकरणातही स्वामी रामानंद तीर्थांचा परिचय दिल्यानंतर राजकीय चळवळीला प्रारंभ होत असताना महाराष्ट्र परिषद, स्टेट काँग्रेसची भूमिका, वंदे मातरम चळवळ, वाटाघाटी सत्याग्रह आणि सुधारणा, रझाकारांचे दहशतवादी हल्ले, सरहद्दीवरील प्रतिकार कॅम्प या घटनांविषयीचे लेखन वाचकाला भूतकाळात घेऊन जाते.
शंकररावजी चव्हाणांचे हैदराबाद मुक्तिसंग्रामातील योगदान याविषयी लेखनात शंकराव चव्हाण यांचा प्रारंभिक काळ, शंकररावांचा विवाह, हैदराबादचे प्रारंभिक दिवस, वंदे मातरम चळवळ, १९४० नंतरचा काळ, मुक्तिसंग्रामातील कॅम्पची भूमिका, उमरखेड कॅम्प येथील शंकररावांचे भूमिगत कार्य, उमरखेड कॅम्पवरील प्रसंग, जंगल सत्याग्रह, करोडगिरी नाक्यावर हल्ले, उमरी बँकेवर हल्ला, इस्लापूर हल्ला, स्टेट काँग्रेसचे संघटक म्हणून कार्य, महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणाच्या शेवटी लेखिकेने अभ्यासांती हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे थिंक टॅंक म्हणून शंकररावजी चव्हाण यांना दिलेली बिरूदावली उल्लेखनीय आहे.
डॉ.शंकररावजी चव्हाण यांचा हैदराबाद मुक्तिसंग्रामातील योगदानावर अत्यंत ओघवत्या भाषेत, पुराव्यानिशी अत्यंत उत्कृष्ट मांडणी केलेली आढळून येते. यासाठी लेखिकेने वापरलेले संदर्भ दर्जेदार असून त्या संदर्भ व माहितीचे स्वभाषेत केलेले विश्लेषण या ग्रंथास एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवते.
शंकररावजी चव्हाण यांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण हा या ग्रंथाचा शेवटचा घटक असून लेखिकेने या घटकास न्याय देताना कोणतीही कसूर ठेवलेली नाही. शंकररावजी चव्हाण यांचा राजकारणातील प्रवेश हा राजकीय क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा क्षण आहे. महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणात शिस्त, प्रामाणिकता, कर्तव्यप्रचुरता, नियम व कायद्याचे कठोर पालन, जलसंस्कृतीचे जनक या नात्याने त्यांनी पार पाडलेली भूमिका युगानयुगे त्यांच्यातील राष्ट्रीय नेतृत्वाची साक्ष देत राहील.
नांदेडवासी शंकरराव चव्हाण, वेळेचे भान ठेवणारा नेता, पाटबंधारे म्हणजे शंकररावजी चव्हाण, जायकवाडी प्रकल्प, विष्णुपुरी प्रकल्प,मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ, राष्ट्रीय नेतृत्वपदी झेप याचे केलेले विवेचन संस्मरणीय आहे.
हा ग्रंथ केवळ वाचनीय व संग्राह्य नसून एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे.या ग्रंथासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.उद्धव भोसले आणि माजी पालकमंत्री श्री.डी.पी.सावंत यांनी दिलेले शुभेच्छा अत्यंत मौल्यवान असून सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.सुरेश सावंत यांची प्रस्तावना एका कवी मनाचे दर्शन घडविते.
मुद्रा ऑफसेट या ग्रंथाचे मुद्रक असून ग्रंथाचे मूल्य केवळ दोनशे रुपये आहे.
*-डॉ.अजय गव्हाणे,*
राज्यशास्त्र विभागप्रमुख,
यशवंत महाविद्यालय, नांदेड
भ्रमणध्वनी:८३२९२५६६३६