वाटा पळवाटा : रंगभूमी ते विचारभूमी” कार्यक्रम उत्साहात संपन्न

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुल व ललित व प्रयोगजीवी कला संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “वाटा पळवाटा : रंगभूमी ते विचारभूमी” हा विशेष कार्यक्रम (मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५ रोजी) मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध नाटककार, लेखक व समीक्षक प्रा. दत्ता भगत यांचे बहुचर्चित नाटक “वाटा पळवाटा” याचे स्क्रिनिंग व चर्चा आयोजित करण्यात आली. या प्रसंगी प्रा. दत्ता भगत व त्यांच्या पत्नी सुमन भगत यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रा. भगत आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, “चार दशकांपूर्वी ‘वाटा पळवाटा’ नाटकाने मला नाटककार म्हणून मान्यता मिळवून दिली. विद्यापीठाच्या प्रारंभीच्या जडणघडणीच्या काळात मला योगदान देता आले. याच विद्यापीठाने माझा ‘जीवन साधना गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान केला. या सगळ्याचा उतराई व्हावा म्हणून माझ्या संग्रहातील पुस्तके मला डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राला देता आली, याचे समाधान आहे.”
यावेळी प्रा. दत्ता भगत यांनी आपल्या ग्रंथसंपदेचा मौल्यवान ठेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. सुनीता पाटील यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द केला.
कार्यक्रमात प्रमुख भाष्य करताना डॉ. शैलजा वाडीकर म्हणाल्या, “प्रत्येक पात्राची मानसिकता लक्षात घेऊन लिहिलेलले हे नाटक तत्कालीन संदर्भांत जरी असले तरी काळाच्या मर्यादा ओलांडून आजच्या पिढीपर्यंत पोहोचते. नवीन पिढीलाही हे नाटक आपले वाटते, हेच यश आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर (संचालक, माध्यमशास्त्र संकुल) यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. पृथ्वीराज तौर (संचालक, ललित व प्रयोगजीवी कला संकुल) यांनी मानले.
या वेळी डॉ. दिलीप चव्हाण (संचालक, भाषा संकुल), डॉ. अविनाश कदम, डॉ. रमेश ढगे, डॉ. सचिन नरंगले, प्रा. गिरीश जोंधळे, डॉ. योगिनी सातारकर, डॉ. हरी पाटोडे, काळबा हनवते, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, तसेच माजी शिक्षण संचालक नंदन नांगरे यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.