विकसित भारतासाठी युवकांनी योगदान द्यावे : प्र- कुलगुरू डॉ. अशोक महाजन.
के.के. एम. महाविद्यालयात दीक्षांत समारंभ.

मानवत / प्रतिनिधी
———————
विकसित भारत निर्माण करण्यासाठी युवकांनी योगदान द्यावे असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी केले.
येथील के.के.एम. महाविद्यालयात दि.28 रोजी दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर व्यासपीठावर पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळा चे सहसचिव विजयकुमार दलाल, संचालक संजय बांगड, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड,
प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, उपप्राचार्य डॉ.के. जी. हुगे, डॉ. के. बी. पाटोळे, डॉ. पवन पाटील, प्रा. सुनीता कुकडे उपस्थित होते.
स्नातकांना दीक्षांतपर मार्गदर्शन करताना महाजन यांनी सांगितले की, विकसित भारताच्या जडणघडणीत युवकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे विविध शाखेतून पदवी मिळवलेल्या युवकांनी आपले कौशल्य पणाला लावून भारताची अर्थव्यवस्था बळकट करावी. त्याच बरोबर विध्यार्थ्यांनी कौटुंबिक, सामाजिक क्षेत्रात योगदान दिले तर एक आदर्श नागरिक निर्माण होईल परिणामी भारताच्या प्रगतीत मोठे योगदान लाभेल. आदर्श महाविद्यालय उमरगाचे प्राचार्य डॉ.दिलीप गरुड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यापीठ क्षेत्रात के. के. एम. महाविद्यालय हे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून यशस्वी विध्यार्थी घडवणारे आदर्श महाविद्यालय आहे. नेहमी गुणवत्तेला प्राधान्य देणारे महाविद्यालय म्हणून के. के. एम. महाविद्यालय नावारूपाला आलेले आहे.
प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शारदा राऊत यांनी तर आभार डॉ. कैलास बोरुडे यांनी मानले.
***