https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे साधणार युवा मतदारांशी संवाद

नांदेड जिल्ह्यात मतदार जागृती बाबत व्यापक मोहिम

▪️धनेगाव व बळीरामपूरच्या 71 भटक्या विमुक्तांना निवडणूक ओळखपत्र होणार बहाल

नांदेड (जिमाका), दि. 15 :- भारतातील प्रत्येक पात्र नागरिकांना मतदानाच्या प्रक्रियेत उत्स्फुर्त सहभाग घेता यावा व मतदानाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी याउद्देशाने निवडणूक विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे 16 ऑगस्ट रोजी महात्मा गांधी मिशन अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सकाळी 11 वाजता युवा मतदारांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उपप्राचार्य एस. एल. कोटगिरे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. एम. राजूरकर आदी मान्यवर उपस्थित राहतील. निवडणूक विभाग व महात्मा गांधी मिशन अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमात युवा मतदारांकडून ऑनलाईन सुविधाद्वारे मतदान ओळखपत्राचा फॉर्म प्रातिनिधीक स्वरुपात भरुन घेतला जाणार आहे.

*धनेगाव व बळीरामपूरच्या 71 भटक्या विमुक्तांना निवडणूक ओळखपत्र होणार बहाल*

भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. समाजातील प्रत्येक पात्र घटकाला मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी निवडणूक विभाग गाव पातळीपर्यंत कार्यरत आहे. भटके विमुक्त हे अनेक ठिकाणी रोजी-रोटी च्या उद्देशाने सतत भटकंतीवर असल्याने मतदान ओळखपत्रासाठी अत्यावश्यक असणारे आधार व इतर कार्ड त्यांच्याकडे फारसे दिसून येत नाहीत. यादृष्टीने नांदेड जिल्हा निवडणूक विभाग, महसूल विभागाने विशेष प्रयत्न करुन भटक्या व विमुक्तांना निवडणूक ओळखपत्र रितसर काढून दिली आहेत. नांदेड जवळील धनेगाव व बळीरामपूर गावातील जोशी, गोंधळी, कुडमुडे जोशी, गारुडी आदी भटक्या विमुक्त असलेल्या 71 व्यक्तींना मतदान कार्ड राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याहस्ते दिले जाणार आहेत. यावेळी भटके व विमुक्त जाती जमातीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष देविदास हादवे यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी 1 वा. बळीरामपूर येथे गावात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

*युवा मतदार व तृतीय पंथीय मतदार यांच्याशी सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवात विशेष कार्यक्रम*

भारतीय लोकशाहीला भक्कम करण्याचा मार्ग हा मतदान प्रक्रियेशी निगडीत आहे. जितके जास्त मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील त्याप्रमाणात लोकशाही सशक्त होत जाईल. समाजातील प्रत्येक घटकांमध्ये तृतीय पंथीय हा सुध्दा एक घटक आहे. त्यांनाही मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. बऱ्याच वेळा स्वत:ची मूळ ओळख बाजूला ठेऊन घर सोडून राहिल्याने अनेक तृतीय पंथीयांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ओळखपत्र नसल्याने अडचणी निर्माण होतात. त्यांना आधार, रेशनकार्डसह मतदान कार्ड अर्थात ओळखपत्र मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक विभाग प्रयत्नशील आहे. यादृष्टीने नांदेड येथे सप्तरंग महोत्सवात विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वा. कुसुम सभागृहात या कार्यक्रमात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे तृतीय पंथ मतदार व युवा मतदार यांच्याशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाच्या मुख्य समन्वयिका डॉ. सान्वी जेठवानी यांनी केले आहे.

00000

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704