नेसुबो महाविद्यालयात लेखन कौशल्य कार्यशाळा संपन्न* (विद्यापीठ स्तरीय तीन दिवसीय कार्यशाळेचे केले होते आयोजन

नांदेड: अभिनव भारत शिक्षण संस्था संचलीत नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने तीन दिवसीय लेखन कौशल्य विकसीत करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयासह वसंतराव नाईक महाविद्यालय, वसरणी, नांदेड तसेच महिला महाविद्यालय नांदेड येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या तीन दिवसीय कार्यशाळेमध्ये इंग्रजी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा शिवाजी महाविद्यालय परभणी येथील उप प्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, लोकमत टाइम्सचे संपादक डॉ. डी. आर. माने, डॉ. निर्मल पंडीत, डॉ. दत्ता सावंत, डॉ. राहुल धावरे, डॉ. चेतना हसरगुंडे आदि मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी, उप-प्राचार्य डॉ. कल्पना कदम, इंग्रजी विभाग प्रमुख तथा कार्यशाळेचे समन्वयक प्रोफेसर डॉ. जीवन मसुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जीवन मसुरे यांनी केले आपल्या प्रास्ताविकात बोलत असताना एक उत्तम लेखक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीच्या कार्यशाळेची अत्यावश्यकता आहे त्यामुळे आपल्याकडे आता सर्जनशील लेखनाच्या कार्यशाळा सुरू झाल्या पाहिजे असे मत व्यक्त केले. डॉ. डी. आर. माने यांनी विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रांमध्ये लेखन कशा पद्धतीने केले पाहिजे, त्याबरोबरच लेखनाला कशी शिस्त लागते, दररोज कसे लेखन केलेच पाहिजे, लेखनात मूड, स्फूर्ती इत्यादींना कसे स्थान नसते यावर सखोल मार्गदर्शन केले. प्रो. डॉ. रोहिदास नितोंडे यांनी अत्यंत सोप्या भाषेत विद्यार्थांना मार्गदर्शन केले आपल्या भाषणात बोलत असताना त्यांनी जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या लेखकांची माहिती विद्यार्थ्यांना सांगत प्रसिद्ध लेखक कोणत्या गोष्टीकडे लक्ष देतात याकडे विशेष लक्ष वेधले लेखन त्याच्या नैसर्गिक रुपामध्ये मानवी संवादाचे अत्यंत प्रभावी मध्यम आहे असे ते म्हणाले. बऱ्याच व्यक्तींसाठी स्वतःला लेखनाच्या माध्यमातून व्यक्त करणे हे मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक समजले जाते. असे प्रतिपादन प्रो. डॉ. निर्मल पंडीत यांनी केले. डॉ. दत्ता सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना ई-मेल लेखन, पत्रलेखन बायोडाटा लेखन, परिचय पत्र लेखन या बद्दल सखोल मार्गदर्शन करत महत्त्वाचे मुद्दे पटवून देत उपस्थितांकडून त्यांचे परिचय पत्र तयार करुण घेतले. कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड येथिल इंग्रजी विभाग प्रमुख प्रो. डॉ. राहुल धावारे यांनी विद्यार्थ्यांना नोटीस, मीटिंग अजेंडा, मेमो, लेखन कौशल्य यावर सखोल मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात पुढे बोलतांना ते असे म्हणाले की; लेखन हे अत्यंत आवश्यक असे व्यावसायिक आणि शैक्षणिक कौशल्य आहे. फक्त संवाद साधण्यासाठीच नव्हे तर अनेक शैक्षणिक आणि व्यावसायिक गोष्टींमध्ये स्वतःचा प्रभाव वाढवणे यासाठी लेखन कौशल्य आवश्यक आहे. संशोधक, शिक्षक, विद्यार्थी यांना शास्त्रीय लेखन फक्त वैयक्तिक नव्हे तर व्यावसायिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असते. महाविद्यालयाच्या उप-प्राचार्य डॉ. कल्पना कदम यांनी आपल्या भाषणात बोलत असताना अशा पद्धतीच्या कार्यशाळे मुळे विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य तर सुधारेलच पण त्यांचा सर्वांगीण विकास होइल असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ. एम. वाय. कुलकर्णी यांनी केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत असताना ते असे म्हणाले की; लेखन ही एक कष्टसाध्य कला आहे, येथेसुद्धा खूप मेहनत करावी लागते. केवळ भाषा येते म्हणून लेखक होता येते, असे नाही. उपस्थितांच्या मनात ही जाणीव जरी निर्माण झाली तरी कार्यशाळेचा उद्देश यशस्वी झाला असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप काळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. संजय कुलकर्णी यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी डॉ. गीता भोजणे, प्रा. छाया कोंगेवाड, विकास शर्मा, भरत शर्मा, यासेर शेख, संभाजी तोटरे आदींनी परिश्रम घेतले.