निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग,ध्यानधारणा आवश्यक- रेणुका गुप्ता

तामसा: आनंदी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी दररोज योग ध्यानधारणा आवश्यक आहे. देशाची भावी उज्वल पिढी घडवण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने स्वतः उत्तम आरोग्य जपलं पाहिजे, असे प्रतिपादन फिटनेस कोच रेणूका गुप्ता यांनी केले.
हदगाव तालुक्यातील तामसा येथील जिल्हा परिषद शाळा येथे योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी किशनराव फोले हे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राम वाघमारे,वरिष्ठ उपसंपादक भारत दाढेल,प्रशांत कराळे, डॉ. भगवान सूर्यवंशी, गुलजार ठाकूर यांची उपस्थिती होती.
रेणुका गुप्ता म्हणाल्या,
धावपळीच्या युगात आपण स्वतःच्या शरीराला वेळच देत नाही. त्यामुळे शरीराच्या अनेक व्याधी सध्या होत आहेत. त्यामुळे शरीर तंदुरुस्त असणे सध्या गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य हवे आहे. पण त्यासाठी कोणताच व्यायाम करणे आवडत नाही. दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य हवे आहे पण त्यासाठी पौष्टिक आहार व व्यायाम याकडे कोणी लक्ष कोणी देत नाही.
तरुण वयामध्ये अनेक रोगांचे माहेरघर आपले शरीर झाले आहे. आज प्रत्येक कुटुंबात बीपी,शुगर,थायरॉईड ,विकनेस, वेटलॉस,वेट गेन,निद्रानाश ,अस्वस्थता यासारख्या गंभीर आजाराने व्यापलेले आहे. भारतातील प्रत्येक कुटुंब निरोगी रहावे, यासाठी प्रत्येकाने स्वतःसाठी किमान एक तास व्यायामासाठी देणे आवश्यक आहे. स्वस्थ भारत निरोगी भारत या संकल्पनेवर ड्रीम फिटनेस स्टुडिओ गेल्या पंधरा वर्षापासून नांदेडमध्ये काम करत आहे . लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करने त्यांना निरोगी राहण्यासाठी मदत करने हेच आमचे ध्येय आहे, असे ही त्या म्हणाल्या.
फोले यांनी, धकाधकीच्या जीवनात शिक्षक तंदुरुस्त असला पाहिजे. त्यासाठी किमान रोज स्वतःला एक तास दिला पाहिजे. देशाची भावी पिढी घडवणारा शिक्षक हा निरोगी असलाच पाहिजे. त्यासाठी योग शिबिराचे आयोजन केल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक अक्कमवाड ,कपाटे, केंद्रप्रमुख चंद्रकांत मेकाले यांच्यासह जिल्हा परिषदेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.