अनाथाश्रमात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण : अनाथ मुलांना दिलीप ठाकूर यांच्या टीमतर्फे कडधान्य देऊन आगळ्या वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा

नांदेड:
*लहुजी साळवे बालकाश्रम धनगरवाडी येथे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून याप्रसंगी अनाथ मुलांना दिलीप ठाकूर यांच्या टीमतर्फे कडधान्य देऊन आगळ्या वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.गेल्या पाच वर्षांपासून अनाथ मुलांना मदत म्हणून लहुजी साळवे बालकाश्रम येथे दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून भाजप महानगर नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हैदराबाद येथील सुप्रसिध्द समाजसेविका स्नेहलता जयस्वाल यांनी भूषविले. याप्रसंगी भाजपा कामगार आघाडीचे सुरेश लोट, लायंसचे माजी अध्यक्ष अरुण काबरा, सविता काबरा, अनुराधा वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला संस्थेचे सचिव लालबाजी घाटे यांनी प्रास्ताविक करताना गेल्या वर्षापासून संस्थेला अनुदान न मिळाल्यामुळे अनाथ विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी आली असल्याचे सांगताना ते गहिवरून गेले. यानंतर दिलीप ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की,परिस्थिती कशीही असली तरी न डगमगता अथकपणे त्याला सामोरे जाऊन संकटांवर मात करावी.दानशूर नागरिकांनी या अनाथाश्रमाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.या प्रसंगी सुरेश लोट,स्नेहलता जयस्वाल,सविता काबरा यांची समयोचित भाषणे झाली. संस्थेची निकडी ची गरज पाहून दिलीप ठाकूर यांनी एक क्विंटल गहू, सुरेश लोट यांनी एक क्विंटल तांदूळ, स्नेहलता जयस्वाल यांनी तीस किलो तुरडाळ आणि अनुराधा वर्मा यांनी तेलाचा डब्याची तात्काळ व्यवस्था केली. काबरा दांपत्याकडून एक महिना भाजीपाल्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. संस्थेच्या अध्यक्षा रेखा घाटे यांनी सर्वांचा सत्कार केला.
यावेळी श्री गुरु गोविंदसिंघजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रॉबिनहुड आर्मी ग्रुपच्या साई तूप्तेवार, तन्मय आडसकर, आर्यन बडोदिसा, नुपूर, शर्मिनी या सह इतर विद्यार्थ्यांनी बालकाश्रमातील मुलांना खाऊ वाटप करुन विविध खेळ घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्योती गायकवाड यांनी तर आभार सूरज ढवळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी पवळे, प्रतिभा जाधव, सत्यभामा पवळे यांनी परिश्रम घेतले. दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमने धान्य पुरवठा करून अनाथ मुलांना सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.