ताज्या घडामोडी

गोंडवाना विद्यापीठाच्या “Know-Age Series 5.0” मध्ये डॉ. संदीप एस. काळे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान

गडचिरोली | १९ एप्रिल २०२५
नेताजी सुभाषचंद्र बोस कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नांदेड येथील इंग्रजी विषयाचे सहायक प्राध्यापक डॉ. संदीप एस. काळे यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या इंग्रजी पदव्युत्तर अध्यापन विभागामार्फत आयोजित “Know-Age Series 5.0” या विद्वत्तापूर्ण मालिकेअंतर्गत “Exploring Structural and Lexical Ambiguity” या विषयावर एक अभ्यासपूर्ण व वैचारिक व्याख्यान दिले.
हे व्याख्यान १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता Microsoft Teams या ऑनलाईन माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक, आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. भाषाशास्त्र आणि साहित्यविषयक अभ्यासात ‘अस्पष्टता’ या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित करत, डॉ. काळे यांनी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.


डॉ. काळे यांनी संरचनात्मक व शब्दसंगत अस्पष्टतेच्या (structural and lexical ambiguity) विविध पैलूंवर प्रकाश टाकताना भाषेतील अर्थनिर्णयनातील गुंतागुंत आणि त्यातील सौंदर्य उलगडले. त्यांनी साहित्यातील निवडक उदाहरणे, दैनंदिन संभाषणातील संदर्भ, तसेच माध्यमातील वापर यांची सांगड घालून भाषेतील अस्पष्टतेचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. त्यांची बहुविध शैक्षणिक भूमिका आणि संवादक्षम सादरीकरणशैलीमुळे व्याख्यान विशेष लक्षवेधी ठरले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये सहभागी विद्यार्थी व अभ्यासकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. डॉ. काळे यांनी अत्यंत संयमित आणि तात्त्विक दृष्टिकोनातून प्रश्नांची उत्तरे दिली.
व्याख्यानाच्या समाप्तीनंतर इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. विवेक व्ही. जोशी यांनी डॉ. काळे यांचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी डॉ. काळे यांच्या व्याख्यानाची स्तुती करताना त्यांचे स्पष्ट विचार, सखोल ज्ञान आणि विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. विभाग अशा प्रकारच्या आगामी शैक्षणिक उपक्रमांमध्ये डॉ. काळे यांचे सहकार्य लाभावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
“Know-Age Series 5.0” ही मालिका शैक्षणिक विचारांची देवाणघेवाण घडवून आणणारी एक महत्त्वाची व्यासपीठ ठरली असून, डॉ. काळे यांच्या सहभागामुळे तिची शैक्षणिक उंची निश्चितच वाढली आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.