ज्ञानदीप शिक्षण व संशोधन प्रतिष्ठान, नांदेड आयोजित परिसंवादात ‘उच्च शिक्षण धोरण : आव्हाने आणि दिशा’ या ग्रंथावर सखोल चर्चा

नांदेड, दि. __ : ज्ञानदीप शिक्षण व संशोधन प्रतिष्ठान, नांदेड यांच्या वतीने प्रा. डॉ. डी. एन. मोरे लिखित ‘उच्च शिक्षण धोरण : आव्हाने आणि दिशा’ या महत्त्वपूर्ण ग्रंथावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादात उच्च शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपावर, शासकीय धोरणांच्या अंमलबजावणीवर आणि त्यातील समस्यांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. डॉ. व्यंकटेश काब्दे होते. या प्रसंगी मा. डॉ. सुधीर गव्हाणे (माजी कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक) यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थितीमध्ये स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. मनोहर चासकर, नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव मा. सौ. श्यामल पत्की, प्राचार्य व माजी प्र-कुलगुरू मा. डॉ. गणेशचंद्र शिंदे, माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य मा. नरेंद्र दादा चव्हाण व मा. डॉ. सूर्यकांत जोगदंड, पीपल्स कॉलेजचे प्राचार्य मा. डॉ. आर. एम. जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथ लेखक डॉ. डी. एन. मोरे यांनी केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी उच्च शिक्षण धोरण आणि आव्हाने या ग्रंथाची आज घडीला नितांत गरज आहे व त्यामध्ये दर्शवलेल्या काही महत्त्वपूर्ण सूचना ह्या गांभीर्याने घेतल्या पाहिजे असे नमूद केले. मा. डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या सखोल आणि वास्तवदर्शी भाषणात त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील विदारक वास्तव, शासकीय अनास्था आणि समाजाची भूमिका यावर ठोस भाष्य केले. आज भारतात १३३१ विद्यापीठे व ६७,९६६ महाविद्यालये असून स्वातंत्र्यानंतर अवघ्या २० विद्यापीठांपासून सुरू झालेला हा प्रवास लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणणारा ठरला आहे. भारतात १८ ते २३ वयोगटातील १४ कोटी ८५ लाख विद्यार्थी असून त्यातील अनेक अद्याप शिक्षण प्रवाहाबाहेर आहेत.
जागतिक स्तरावर ८४ कोटी विद्यार्थी शाळाबाह्य असून त्यातील तब्बल १२ कोटी भारतातील आहेत.
सध्या भारतात ४ कोटी ३४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. GER (Gross Education Ratio) बाबत भारत, इंडोनेशिया आणि चीन यांच्या तुलनेत भारतात अजूनही शिक्षण प्रसाराची मोठी गरज आहे असे ते म्हणाले. भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किमान अडीच हजार विद्यापीठांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या २२ वर्षात १३२ शैक्षणिक संस्थांना भेटी देताना मिळालेले अनुभव आणि निरीक्षण त्यांनी शेअर केले. उच्च शिक्षणात सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर परखड टीका करत त्यांनी याला ‘Criminal Negligence of Government’ असे संबोधले. NAAC मूल्यांकनाबाबतही गंभीर चिंता व्यक्त करत, त्यांनी आज भारतात ८३६० महाविद्यालयांपैकी अत्यल्प टक्के महाविद्यालयेच मूल्यांकनप्राप्त असल्याचे स्पष्ट केले. डॉ. गव्हाणे यांनी शिक्षण क्षेत्र हे केवळ सरकारचे नव्हे तर समाजाचेही एक महत्त्वाचे उत्तरदायित्व असल्याचे अधोरेखित केले. या परिसंवादातून आधुनिक भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली. परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव प्रा. डॉ. संदीप काळे यांनी केले तर आभार डॉ. संगीता अवचार यांनी मानले. परिसंवादाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानदीप शिक्षण व संशोधन प्रतिष्ठानचे डॉ. रोहिदास नितोंडे, डॉ. दत्ता सावंत, डॉ. तुकाराम हापगुंडे, सौ. सुनीता मोरे, बालाजी जाधव, अमोल हणमंते आदींनी परिश्रम घेतले.