ताज्या घडामोडी

सामाजिक भान आणि आयुष्याची बांधिलकी जोपसणारे प्राचार्य डॉ. व्ही.एन.इंगोले ओ

महाराष्ट्रातील मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या मराठवाड्यात वास्तव्य करणाऱ्या सर्वांनाच परिश्रमाशिवाय हाती काहीच लागले नाही. मग हे परिश्रम व्यवसायाचे असो शिक्षणाचे असो नोकरीचे असो व अन्य क्षेत्रातील असो. ते सर्व परिश्रमातून पुढे आले आहे. मराठवाड्याचा विचार केला तर शेती असून पाणी नाही पाणी असून पीक नाही पीक असून भाव नाही. मनुष्यबळ असून हाताला काम नाही. असे हे एकत्रित मराठवाड्याचे वास्तव चित्रण आहे. असे वास्तव चित्र डोळ्यासमोर असताना आपण सुद्धा काहीतरी करायला हवे अशी जिद्द, चिकाटी आणि परिश्रम ज्यांच्या अंगी आहे, त्यांनी मात्र आपल्या क्षेत्रामध्ये स्वतःला उज्वल बनवत आपल्या क्षेत्राला सुद्धा नावलौकिकत्व मिळवून दिले आहे. याच भागातील पूर्वीचे उस्मानाबाद आताच्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातल्या मास्सा खंडेश्वर या गावातला एक सामान्य तरुण कष्ट जिद्द परिश्रम आणि आत्मविश्वास या जोरावर एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या स्पर्धेत उतरतो. अशी गुणवत्ता असलेला तरुण म्हणजे विश्वंभर नागनाथराव इंगोले.
त्यांची ओळख कायम व्ही एन इंगोले या नावानेच उजळत राहिली. भारत स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीत जन्म झालेल्या पिढीचे एक वेगळे वैशिष्ट्ये राहिले आहे.या पिढीतील लोकांना एकीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी तर दुसरीकडे ज्ञानार्जनाची भूक भागवण्यासाठी सतत संघर्ष करावा लागला. व्ही. एन. इंगोले सर सुद्धा अशा संघर्षातून मागे राहिले नाही. एका निरक्षर आणि शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे शिक्षण घेण्यासाठी म्हणावं तेवढी जागरुकता नव्हती. असे असतानाही प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. पण पुढील शिक्षण घेण्याची इच्छा होती,त्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती सुबक नव्हती.काहीही झाले तरी पुढे शिकले पाहिजे. अशा विचारातून सरांनी आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचा निर्धार केला. त्यावेळी प्रचंड दुष्काळ पडला होता. तरीही शिक्षणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पूर्ण व्हावे. त्यासाठी काहीही केल तरीही चालेल. त्यासाठी त्यांनी रस्त्याच्या खोदकामावर मजुरी करणे, रातपाळीला तेल गिरणीत काम करणे, मेसमध्ये भांडे घासणे, भाजीपाला आणणे अशा मिळणाऱ्या कामातून जे काही तूटपुंजे पैसे मिळत होते. त्यातून व्ही.एन. इंगोले सरांनी आपल्या उच्च शिक्षणाचे ध्येय पूर्ण केले. दिवस व रात्रपाळीचे काम करत एम.ए. चा अभ्यास करून राज्यशास्त्र विषयात विद्यापीठात दुसऱ्या क्रमांकाचे प्राविण्य मिळविले.
एकीकडे परिश्रमावर पोट आणि त्यावर शिक्षण घेत असताना राष्ट्र उभारणीच्या कार्यात ज्या ज्या लोकांनी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे त्यांची विचारधारा आणि कार्य समजावून घेतले पाहिजे. ही धडपड त्यांच्या मूळ विचारात कायम बसलेले होते. त्यामुळेच विद्यार्थी दशेत असतानाच पुरोगामी युवक संघटना, राष्ट्रसेवा दल, युक्रांद, मराठावाडा जनता विकास परिषद, समजवादी अध्यापक संघ यासारख्या सामाजिक आणि राष्ट्रीय चळवळीतून सक्रिय सहभाग नोंदवून आपल्याला सामाजिक भान आणि जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अशी ही विद्यार्थी आणि तरुण अवस्थेतील जडणघडण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यात वेळ दिला पाहिजे. ही गोष्ट जेवढी खरी आहे तेवढीच त्यासाठी लागणारा पैसाही आवश्यक आहे. म्हणून एखाद्या चांगल्या संस्थेत नोकरी करत आपला हा आनंद जोपासता आला पाहिजे. या विचारातून त्यांना स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या पीपल्स कॉलेज नांदेड येथे राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून 1976 साली नोकरी करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने केले. या दरम्यानच्या काळात त्यांचा महाराष्ट्रातल्या तज्ञ, बुद्धिमान, विद्वान, संशोधक, शास्त्रज्ञ, विचारवंत, कुलगुरू, समाज सुधारक अशा विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तीचा सहवास लाभला.
केवळ आपल्या मध्ये विचारांची समृद्धता बाळगून चालत नाही तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये त्या विचारांची व्यापकता सर्वसमावेशकता आणि दूरदृष्टी निर्माण झाली पाहिजे. यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे या ध्येयाने प्रेरित होऊन डॉ.इंगोले सर यांनी आपल्या प्राध्यापक पदाच्या कारकिर्दीत वाचन, लेखन, चिंतन,मनन, मार्गदर्शन, संशोधन, प्रशासन, समाजसेवा, सामाजिक चळवळीतील सक्रिय सहभाग अशा एकाच वेळी विविध स्तरावर सतत सक्रिय राहून आपल्या ज्ञानर्जणाच्या कक्षा रुंदावत असताना त्या समाजाच्या आणि राष्ट्राच्याही रुंदवल्या पाहिजे.ही काळजी घेतली होती. कोणताही विचार व्यासपीठावरून बोलल्यामुळे वास्तवतेत उतरत नाही. तर तो विचार प्रत्यक्ष कृतीतून उतरला पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचे धाडस व्ही एन इंगोले सर यांनी आपल्या आचार आणि विचारात कायम राखले आहे. एक उत्तम शिक्षक प्राध्यापक म्हणून अध्यापकाची भूमिका त्यांनी सर्वोत्तम पातळीपर्यंत येऊन पोहोचली. त्यामुळेच आज व्ही एन इंगोले सरांचे संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थी पसरलेले आहेत. त्यांचे विचार फिरत आहेत. एका शिक्षकात विद्यार्थ्यांप्रती असलेले समर्पण, आत्मभाव, तळमळ आणि समाजभान लक्षात घेता. अशी सर्वसमावेशक ऊर्जा असलेल्या व्यक्तिमत्त्वाला जर एखाद्या उच्च शिक्षण संस्थेच्या प्राचार्य पदाची संधी दिली तर निश्चितच त्या संस्थेचे कायापालट होऊ शकते. म्हणून डॉ.व्ही एन इंगोले सर यांना पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून संधी दिली पाहिजे. असा विचार स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोविंदभाई श्राफ, डॉ.व्यंकटेश काबदे, सदाशिवराव पाटील या मंडळींनी केला. त्यांनी इ. स. 2002 साली. डॉ. व्ही. एन. इंगोले यांची पीपल्स कॉलेज नांदेडचे प्राचार्य पदावर गुणवत्तेच्या आधारे नियुक्ती केली.
डॉ. व्ही एन इंगोले सर यांनी पीपल्स महाविद्यालयाचा प्राचार्य पदाचा पदभार हाती घेतला. त्यानंतर या महाविद्यालयाच्या शैक्षणिक आकृतीबंधात अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्यांनी 2002 ते 2016 या 14 वर्षाच्या पीपल्स कॉलेजचे प्राचार्यपद भूषविले. त्यांनी प्राचार्य पदाची भूमिका बजावत असताना विविध क्षेत्रात विद्यार्थी आणि प्राध्यापक आणि महाविद्यालयाला अधिक कृतिशील आणि प्रयोगशील बनविले. महाविद्यालयाला NAAC चा ‘अ’ दर्जा मिळवून दिला. आपल्या प्राचार्य पदाच्या कारकिर्दीत महाविद्यालयाची प्रगती दिवसेंदिवस गतिमान झाली पाहिजे. या प्रयत्नातून पीपल्स कॉलेजने विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करत होते. पुढे त्यांच्या कामाची दखल घेत स्वामी रामांनंद तीर्थ विद्यापीठाने ‘उत्कृष्ट कॉलेज’ आणि ‘उत्कृष्ट प्राचार्य’ म्हणून पुरस्काराने सन्मानित केले आहे. सरांना एकाच वेळी प्राचार्य,महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या स्तरावर अधिष्ठाता म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
विविध स्तरावर काम करण्याची संधी आणि मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांना पुन्हा आपल्या महाविद्यालयाला उच्च शिक्षणात गुणवत्ता मिळाली पाहिजे यासाठी जे जे करता येईल तेथे केले पाहिजे या दूरदृष्टीतून नांदेड मध्ये राहून मुलींना शिक्षण घेता आले पाहिजे. त्यासाठी सर्व सोयीनीशी सुसज्ज असलेले मुलींचे वस्तीगृह उभारले. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थिनीच्या सक्षमीकरण झाले पाहिजे. त्यासाठी विषेश योजना राबविली. त्याबदल प्राचार्य व्ही एन इंगोले यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमिकरणाचा पुरस्कार देऊन महाविद्यालयाचा विशेष गौरव केला. आपल्या प्राचार्य पदाच्या काळात दिवसाचे 24 तास स्वतःला राबवून घेत महाविद्यालयाने गुणवत्तेच्या क्षेत्रात उत्तुंग अशी भरारी घेतली. यासाठीच त्यांनी प्रयत्नशील राहिले. बऱ्याचदा प्रशासक म्हणून काम करत असताना अनेक गोष्टी अंगावर घेऊन केल्या. त्याचाही परिणाम त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेकदा भोगावे लागला. तरीही न डगमगता कोणतेही परिवर्तन करत असताना पुढाकार घेणाऱ्यांना अनेक संकटे झेलावी लागतात. अशी अनेक संकटे प्राचार्य पदाच्या कार्यकाळात प्राचार्य इंगोले सर यांना भोगावे लागली आहेत. अनेक लोक नाराज झाले, तरी त्यांनी महाविद्यालयाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली नाही. माझे महाविद्यालय माझे कुटुंब आहे. असं म्हणत नेहमी महाविद्यालयांच्या उत्तरोत्तर गुणवत्तेला प्रथम प्राधान्य राहिले पाहिजे. या दूरदृष्टीतून त्यांनी पीपल्स कॉलेजच्या विकासाचा जो संकल्प हाती घेतला होता. त्याच संकल्पचा भाग म्हणून पुढे विद्यापीठ अनुदान आयोगाने पीपल्स कॉलेजची ‘कॉलेज विथ पोटेंशियल एकलंस’ म्हणून निवड करून दोन कोटी रुपयाचे विशेष अनुदान मिळवून दिले.
माझे पीपल्स कॉलेज केवळ पारंपारिक ज्ञान देणारे महाविद्यालय न राहता ते बदलत्या काळाची पाऊले उचलत विद्यार्थ्यांना त्यानुरूप शिक्षण घेता आले पाहिजे. माझे महाविद्यालय जगाशी जोडले पाहिजे. यासाठी संपूर्ण महाविद्यालय संगणकीकृत केले.आपल्या महाविद्यालयात अध्यापन, प्रशासन, ग्रंथालय, इत्त्यादी सर्वच विभागात संगणक आणि सॉफ्ट्वेअरचा मोठ्या प्रमाणात वापर केला पाहिजे. यासह त्यांनी महाविद्यालायात दुरस्थ व निरंतन शिक्षण प्रणाली रुजविली. महाविद्यालयातील नरहर कुरुंदकर सभागृहाचे अध्यावतीकरण करून ते चळवळीच्या मुक्त संवादाचे केंद्र बनविले, महात्मा गांधी वसतिगृह व मुलांचे वसतीगृह अध्यावत बनविले आणि शंभर मुलिंना राहता येईल असे वसतिगृह बांधून सज्ज केले. त्यामुळेच आज या वस्तीगृहामध्ये राहून अनेक गरजु मुलींना शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होत आहे.
विविध उपक्रम राबविल्यामुळे प्राचार्य डॉ. व्ही एन इंगोले सर यांच्या कारकिर्दीतील पीपल्स महाविद्यालयाने नवे रूप धारण केले होते. महाविद्यालयाला एक नवीन ओळख निर्माण झाली होती. असे असले तरीही प्राचार्य व्ही एन इंगोले सर यांनी आपल्या प्राध्यापक आणि प्राचार्य पदाच्या चार दशकाच्या कारकिर्दीत अध्ययन,अध्यापन, संशोधन, मार्गदर्शन आणि प्राचार्य म्हणून प्रशासक पद भूषविले. त्याचबरोबर त्यांनी आपले वैचारीक, क्रमिक वा सामाजिक लेखन कायम ठेवले. त्यांचे भारताचे परराष्ट्र धोरण, भारतीय शासन व राजकारण, साने गुरुजींचे विचारधन आदी अनेक दर्जेदार पुस्तके प्रकाशित आहेत.याशिवाय त्याचे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी १५ विद्यार्थ्यांनी एम.फिलसाठी आणि १२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. संशोधन कार्य यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन त्यांच्या हातून जे विद्यार्थी घडले आहेत आजही त्यांचे सर्व संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांना दिलेले मार्गदर्शन ही एक मोलाची शिदोरी आहे. आजही प्राचार्य डॉ. व्ही. एन. इंगोले सर यांच्या विविध पुरोगामी आणि परिवर्तनवादी संस्था व चळवळीच्या माध्यमातून केलेले कार्य राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिवर्तनाचे मार्गदर्शक आहेत. मी त्यांचा विद्यार्थी म्हणून दोन वर्ष मार्गदर्शन आणि सहवास घेता आला. म्हणूनच मला त्यांच्या कार्याचा खूप खूप अभिमान आहे. मी आज प्राचार्य डॉ. व्ही एन इंगोले यांच्यावर जे शब्दांकन करत आहे. ते शब्दांकन करण्याचे भाग्य मला आपल्या मार्गदर्शनामुळे आणि सहवासामुळेच प्राप्त झाले आहे. आपण दिलेली ही शब्दांकनांची शिदोरी सोबत ठेवता ती पुढे कायम चालू ठेवली पाहिजे.यासाठी माझ्याकडून नेहमी प्रयत्न करत राहणे हा आशीर्वाद माझ्या सोबत असावा.
आदरणीय गुरुजी प्राचार्य डॉ. व्ही. एन. इंगोले सर आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा……!

शब्दांकन
प्रा.डॉ. प्रभाकर गणपतराव जाधव
सहयोगी प्राध्यापक,
राज्यशास्त्र विभाग प्रमुख
लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.