शिवरायांच्या काळात स्त्रियांना सन्मानाची वागणूक – शिवचरित्र अभ्यासक सुभाष ढगे (नेसुबो महाविद्यालयात शिवजयंती निमित्त व्याख्यान संपन्न)

नांदेड(प्रतिनिधी): भारताच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले.परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात स्त्रियांना सुरक्षितता आणि सन्मानाची वागणूक मिळाली. स्त्रियांचा खऱ्या अर्थाने सन्मान करणारे जागतिक पातळीवरील राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते. असे प्रतिपादन शिवचरित्र अभ्यासक सुभाष ढगे यांनी केले.
अभिनव भारत शिक्षण संचालित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या
इतिहास , राज्यशास्त्र विभाग आणि महिला तक्रार निवारण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती आणि जागतिक महिला
दिनानिमित्त विद्वत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवचरित्र अभ्यासक सुभाष ढगे यांनी ‘ छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्त्री विषयक धोरण’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष
बालासाहेब पांडे,तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम,डॉ.अर्चना भवानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना ढगे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे नैतिकता आणि चारित्र्य जपणारे राजे होते. समकालीन इतर राज्यकर्त्यांच्या काळात महिलांना दुय्यम स्थान दिले जात असे. छत्रपती शिवाजीराजे यांनी स्त्रियांना आई आणि देवता समान मानत सन्मान केल्याचे ते म्हणाले.
सध्याच्या काळात महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांना सन्मानाची वागणूक आणि सुरक्षितता मिळण्यासाठी छत्रपती शिवरायांचे स्त्रीविषयक धोरण याचा अभ्यास करावा लागेल असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात बालासाहेब पांडे म्हणाले की, आज घडीला देशातील महिला सुरक्षित नाही. शिवरायांच्या काळात मात्र महिलांना सुरक्षिततेची भावना होती.
महिला सुरक्षित आणि सक्षमपणे पुढे आली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी इतिहास विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या
भितीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख डॉ. संतोष कोटूरवार यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.