यशवंत ‘ मधील ग्रंथपाल डॉ. कैलास वडजे यांच्या दोन ग्रंथांचे थाटात प्रकाशन संपन्न

नांदेड:(दि.२०/०२/२०२५)
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अर्थात पीएम:उषा योजनेअंतर्गत यशवंत महाविद्यालयातील वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र विभागातर्फे “विकसित भारताचा रोड मॅप २०४७” या विषयावरील दोन दिवसीय बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात दि.१७ फेब्रुवारी २०२५ रोजी परिषदेचे उद्घाटक माजी पालकमंत्री तथा श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.श्री.डी. पी.सावंत आणि विचारमंचावर उपस्थित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. डी.एम.खंदारे, त्रिभुवन विद्यापीठ काठमांडू, नेपाळ येथील डॉ. राधेश्याम प्रधान,राजभात विद्यापीठ, बँकॉक, थायलंड येथील डॉ. अरुण चैनीत, सरदार पटेल विद्यापीठ गुजरात येथील डॉ. कामिनी शहा, माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, आयोजक सचिव उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे आणि उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांच्या उपस्थितीत व सर्वांच्या शुभ हस्ते ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे यांचे ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयावरील लिखित दोन ग्रंथ प्रकाशित करण्यात आले.
डॉ. कैलास वडजे यांचा’ॲन इंट्रोडक्शन टू वेबोमॅट्रिक स्टडी’ हा ग्रंथ संस्था, महाविद्यालय, विद्यापीठ, ग्रंथालय व इतर वेबसाईटचा अभ्यास करून त्याची उपयोगिता, विश्लेषण व मुल्यमापन करण्यासाठी उपयुक्त आहे तर त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अंडरस्टँडिंग बिबलिओमॅट्रिक अप्रोच’ याद्वारे विविध प्रकारच्या संशोधनामध्ये व अभ्यासामध्ये वाचन साहित्य; जसे की संशोधन, जर्नल, नियतकालिके, संदर्भ ग्रंथ, ई-साहित्य इत्यादीचा वापर किती झाला आहे, व त्याचे विविध प्रकार आणि त्याची उपयोगिता, विश्लेषण व मूल्यमापन करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
डॉ. कैलास वडजे यांची यापूर्वी विविध नियतकालिक, जर्नलस् व संशोधन पत्रिकामध्ये ३४ संशोधन लेख प्रसिद्ध झाले आहेत तसेच बालभारती या संस्थेवर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी इयत्ता अकरावी व बारावी वर्गाची ग्रंथालय व माहितीशास्त्राच्या पुस्तकांचे संपादनही केलेले आहे. याशिवाय कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक येथील ग्रंथालय माहितीशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठीही एका ग्रंथाचे लेखन केलेले आहे.
याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ. एल. व्ही. पद्माराणी राव, प्रबंधक संदीप पाटील, सहाय्यक ग्रंथपाल संजय भोळे, अधीक्षक कालिदास बिराजदार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे यांनी अभिनंदन केले आहे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.



