ताज्या घडामोडी

यशवंत महाविद्यालयात ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ चे चिकित्सक विश्लेषण’ वर व्याख्यान संपन्न

नांदेड: प्रतिनिधी

यशवंत महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग आणि संशोधन केंद्राच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ चे चिकित्सक विश्लेषण’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्ते सनदी लेखापाल श्री राहुल जिलेवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा यशवंत महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य आदरणीय प्रा.डॉ. गणेशचंद्र शिंदे सर व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. आर. मुठे यांच्या मार्गदर्शनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा यशवंत महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.डॉ. कविता सोनकांबळे यांच्या हस्ते अर्थशास्त्र विभागाच्या वतीने प्रमुख वक्ते सनदी लेखापाल श्री राहुल जिलेवार यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागातील सहयोगी प्रा. डॉ.डी. ए. पुपलवाड यांनी केले. त्यांनी हा कार्यक्रम घेण्या मागचा उद्देश, अर्थशास्त्राचे विद्यार्थी या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पाचे महत्त्व, संकल्पनात्मक व सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच अर्थसंकल्पाबद्दल विद्यार्थ्यांना असणारे वास्तविक ज्ञान व त्याचा समाजहितासाठी उपयोग यावर त्यांनी भाष्य केले.

यावेळी सनदी लेखापाल श्री राहुल जिलेवार यांनी अर्थसंकल्प २०२५-२६ चे चिकित्सक विश्लेषण यावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या अर्थसंकल्पात कृषी, एमएसएमई, गुंतवणूक, निर्यात प्रोत्साहन, वस्तू व सेवा कर संरचना, कर सुधारणा प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर, मुद्रा लोन, सूक्ष्म वित्त, प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक, दारिद्र्य, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, लोकल फॉर होकल, नारीशक्ती, अंगणवाडी पोषण आहार, पर्यावरण संवर्धन या महत्त्वपूर्ण मुद्द्यांच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात कोणते धोरणात्मक बदल व तरतुदी करण्यात आलेल्या आहेत या संदर्भात मागील अर्थसंकल्पातील काही संदर्भ देऊन तुलनात्मक चिकित्सक विश्लेषण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्या प्रा.डॉ. कविता सोनकांबळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हा अर्थसंकल्प सर्व समावेशी विकास साध्य करणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात एका राज्याला दिलेल्या विशेष सोयी सवलतीचा संदर्भ देऊन त्या म्हणाल्या, अर्थकारणावर राजकारणाचा सुद्धा विशेषत्वाने प्रभाव दिसून येतो. यावरून राज्यशास्त्राचे महत्व अधोरेखित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.डी. डी. भोसले यांनी केले. या कार्यक्रमाच्या वेळी प्रा.डॉ. वीरभद्र स्वामी अर्थशास्त्र विभागातील सहकारी प्राध्यापक डॉ. प्रवीणकुमार सेलूकर प्रा. डॉ.एस.डी. आवाळे, प्रा. राहुल लिंगमपल्ले, प्रा. नयना देशमुख, प्रा.डॉ. योगिता पवार हे उपस्थित होते. तसेच पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉक्टर संतोष पाटील यांनी केले

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.