आभाळागत माया तुझी आम्हावरी राहुदे… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नांदेडकरांना भावनिक साद

नांदेडः सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आपला मानुन आजवर तुम्ही भरभरुन दिले. माझी खरी ताकद मायबाप जनता असून तुमची आभाळागत माया माझ्यावर अशीच कायम राहु द्या, अशी भावनिक साद राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी नांदेडकरांना घातली.
महायुतीच्या महाविजयानंतर नांदेडातील नवीन मोंढा मैदानात गुरुवारी दुपारी ना. शिंदे यांची आभारसभा पार पडली. या प्रसंगी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, हरिद्राचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे उपनेते हेमंत पाटील, आ. बाबुराव कदम कोहळीकर, आ. बालाजी कल्याणकर, आ. आनंद बोंढारकर, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी आ. सुभाष साबने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. भाषणाची सुरुवात करताना ना. शिंदे म्हणाले, सचखंड म्हणजे सत्याची भूमी असून येथे विजय सत्याचा झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 9 जागांवर महायुतीचे उमेदवार बहुमताने निवडून आणण्यात लाडक्या बहीणी, लाडके भाऊ यांच्यासह तमाम मतदारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही. मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी आपले सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी जिल्ह्यातून विधानसभेवर शिवसेनेचे तीन आमदार तर विधानपरिषदेच्या माध्यमातून हेमंत पाटील यांना संधी मिळाली आहे. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवा, गाव तिथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक असेल तरच जिल्ह्यात आपली ताकद वाढेल. त्यासाठी प्रत्येकाने योग्य समन्वय ठेवून काम करावे असे आवाहन त्यांनी केले. सत्तांतरात साथ देणाऱ्या बालाजी कल्याणकरांना नांदेड उत्तर मतदारसंघात विकासकामांसाठी तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. यापुढेही विकास निधीची कमतरता भासू देणार नाही. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी तालुकास्तरावर एमआयडीसी, पुनरुत्थानच्या माध्यमातून शहर व परिसरातील रस्ते बांधणी, जलसंधारण, पाणीपुरवठा, रोजगारांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येतील.
काहींनी फक्त आरोप केले, आम्ही आरोपावर प्रत्यारोप न करता कामातून आरोपाचे उत्तर दिले. विरोधकांच्या तोंडून आमच्यासाठी शिव्या निघाल्या परंतु प्रामाणिकपणा पाहून आमच्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या तोंडून ओव्या बाहेर पडल्या. विधानसभा निवडूकीत 80 जागा लढून पैकी 60 जागांवर विजय मिळविला. बाप पळवला, पक्ष पळवला म्हणणाऱ्या उबाळा गटाने 97 जागा लढवून 20 जागा मिळविल्या. शिवाय या निवडणुकीत शिवसेनेला राज्यातून 15 लाखांचे मताधिक्य असल्याचे सांगताना आता सांगा पक्ष कुणाचा असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेसेनेला टोला मारला. मराठव्ााड्यातील जनतेने शिवसेनेवर जिवापाड प्रेम केले, तितकेच प्रेम स्व. बाळासाहेबांनी येथील जनतेवर केले. मला खुर्ची नाही तर माणसं माझ्यासाठी महत्वाची असून मराठव्ााड्याचा अनुशेष भरुन काढण्याची जबाबदारी आपली असल्याचे शिंदे म्हणाले.
……….
चौकट
जो काम करेगा वही राजा होगा…
आपला पक्ष मालक-नोकराचा नाही. माझ्यासह आपण सर्व कार्यकर्ते असून हा पक्ष कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्यांचा आहे. या धारणेवर स्व. बाळासाहेबांनी सर्वसामान्यांच्या मनातील शिवसेनेची स्थापना केली होती. परंतु त्यांच्या निधनानंतर काही ठराविक मंडळी पक्षाचा मालक असल्याप्रमाणे आम्हाला नोकर समजत होते. मुळ धोरणाला तडा जात असल्याने अडीच वर्षापूर्वी बंडखोरी करत सर्वसामान्यांचे हीत जोपासण्याचे काम आम्ही केले. अब राजा का बेटा राजा नही होगा…जो काम करेगा वही राजा होगा असे म्हणत येथे सर्वांना समान संधी आहेत. पदासाठी आपल्या पक्षात पैसा चालत नाही तर मेरीटला महत्व दिले जाते, काम दाखवा पद मिळवा असा सोपा फॉर्मुला आपल्याकडे असल्याचे ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.
सेक्युरिटी झोनमधून प्रवेश न करता नामदार एकनाथ शिंदे यांनी जनतेसाठी असलेल्या प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश केला. यावेळी बंजारा व आदिवासी महिलांनी पारंपरिक पोशाखात नृत्य करून त्यांचे स्वागत केले. दरम्यान सर्वसामान्यांना अभिवादन, हस्तांदोलन करत त्यांनी कॉमन मॅन असलेली इमेज जपल्याचे दिसून आले.


