यशवंत ‘ मध्ये ‘लेखक आपल्या भेटीला व लेखक -वाचक संवाद आणि सामुहीक वाचन’ उपक्रम संपन्न
नांदेड (दि.९ जानेवारी २०२५)
यशवंत महाविद्यालयामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ कार्यक्रमांतर्गत ‘लेखक आपल्या भेटीला व लेखक -वाचक संवाद आणि सामुहीक वाचन ‘ ह्या कार्यक्रमाचे आयोजन माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला लेखक व प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.कल्पना रामराव जाधव याना आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून लेखक-वाचक यांचा सुसंवाद घडुन आला. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यानात बोलताना, विद्यार्थ्यांनी पुस्तकाला आपला मित्र मानला पाहिजे; कारण ग्रंथ हेच गुरु आहेत, तर वाचनासारखे दुसरे कोणतेही टॉनिक किंवा आनंद या जगात मोफत मिळणार नाही. तसेच विद्यार्थ्यांनी आठवड्यातून एका पुस्तकाचे वाचन केले पाहिजे. त्या पुस्तकाच्या माध्यमातून महत्वाच्या टिप्पणी काढल्या पाहिजेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढण्यास चालना मिळते. याबरोबरच विद्यार्थ्यांनी अग्रलेखसुद्धा दररोज वाचले पाहिजेत, असेही त्या पुढे म्हणाल्या.
कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे मंचावर उपस्थित होत्या.
अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असतानाच इतर विविध प्रकारच्या वाचन साहित्याचाही आपल्या उन्नती व प्रगतीसाठी वापर करून ते साहित्य वाचावे. याबरोबरच मोबाईलचा वापर करमणूक म्हणून नाही तर त्यावर उपलब्ध असलेले विविध ई-साहित्य वाचण्यासाठी करावा असे आवाहन केले.
यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरित्र ग्रंथाचे सामुहीक वाचन केले. वाचन संस्कृतीची जोपासना करणारा व विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लावणारा हा आगळावेगळा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला .
प्रारंभी प्रास्ताविक प्रा. राजश्री भोपाळे यांनी केले. आभार ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे यांनी मानले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. कैलास इंगोले व वाचन संकल्प महाराष्ट्र समितीचे सर्व सदस्य डॉ. पद्माराणी राव, डॉ. अजय गव्हाणे, डॉ. संजय जगताप, डॉ. संदीप पाईकराव, डॉ शबाना दुर्राणी, व महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी -विद्यार्थिनीं याप्रसंगी कार्यक्रमास उपस्थीत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉक्टर हरिश्चंद्र पतंगे प्रबंधक संदीप पाटील अधीक्षक कालिदास बिरादार, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.