ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांनी समाज माध्यमाचा वापर करणे टाळावे – सहाय्यक पोलिस निरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे

————————————–
उदगीर :- आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. या युगात आज घडीला लहान मोठे सर्वांच्या हाती मोबाईल फोन उपलब्ध आहेत. मोबाईल च्या एका बटणावर आपण जगात घडणारी कोणतीही घटना एका क्षणात ऐकू व पाहू शकतो. फेसबुक, व्हॉट्स ॲप, इंस्टाग्राम, शेअर चॅट आदी समाज माध्यमाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या समाज माध्यमाचा वापर विद्यार्थी एकमेका सोबत संवाद साधण्यासाठी करीत आहेत. याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे देखील आहेत. त्यामुळे विद्यार्थी जेव्हा शाळेत, कॉलेज मध्ये असतो तेंव्हा हा काळ त्याचे उद्याचे भविष्य निश्चित करणारे असते. अशा काळात विद्यार्थ्यानी या समाज माध्यमाचा वापर करणे शक्यतो टाळावे असे प्रतिपादन उदगीर येथील ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे यांनी केले.
येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांच्या अध्क्षतेखाली पोलिस वर्धापन दिन सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांत कायद्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी, पोलीस हवालदार दुबळगुंडे, हवालदार पडीले, पोलीस अंमलदार बागवान, जय हिंद पब्लिक स्कूलचे प्राचार्य संजय हट्टे, उपप्राचार्य सतीश वाघमारे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. गणेश तोलसरवाड,नॅबेटच्या समन्वयक मनोरमा शास्त्री यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना लोखंडे म्हणाले की, विद्यार्थ्यानी मन लावून अभ्यास करावा. देशातील उच्च पद मिळवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावा. आज या समाज माध्यमाद्वारे मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत आहेत त्याला सायबर क्राईम असे म्हणतात. आपली फसवणूक देखील केली जाऊ शकते त्यामुळे याचा वापर टाळावा किंवा करूच नये असे ही ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्याना पोलिसाचे शस्त्र कसे हाताळावे याचे देखील प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सुधीर जगताप म्हणाले की, आज विद्यार्थ्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बद्दल माहिती किंवा जागरूकता मोहीम राबविणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या युगात गुन्ह्याचे स्वरूप बदले आहे. ऑनलाईन फसवणूक मग ती आर्थिक असो किंवा मानसिक की शारीरिक ही होतांना दिसून येत आहे. या पासून स्वतःचा बचाव कसा करायचा याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. विद्यार्थी शाळेत असो किंवा कॉलेज मध्ये आपल्या रील लोकप्रिय व्हाव्यात म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. आपल्या सोबतच्या मित्र व मैत्रिणीना फसवत आहेत त्यांना अपमान वाटेल त्या पोस्ट सेंड करीत आहेत. हे प्रकार चिंताजनक आहे. जय हिंद पब्लिक स्कूल मध्ये अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी योग्य ती उपाय योजना करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यासाठी तक्रार दान पेटी देखील ठेवण्यात आली आहे असे ही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय हट्टे यांनी तर सूत्रसंचालन क्रिडा शिक्षक संदीप पवार व आभार सतीश वाघमारे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय हिंद पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठया संख्येनी विद्यार्थी उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.