नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर शिवनीकर यांना शिक्षण रत्न पुरस्कार.
नांदेड (प्रतिनिधी) नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर शिवनीकर सर यांचा प्राचार्य पदाचा कार्यकाळ यशस्वीरित्या नुकताच पूर्ण झाला. आपल्या विचारांची व कर्तृत्वाची महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर छाप असलेले बहुआयामी, सर्वव्यापी, सर्वस्पर्शी असे महाराष्ट्राला लाभलेले वरदान म्हणजे मा. डॉ. सुधीर शिवनीकर त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, व संशोधन क्षेत्रातील कर्तृत्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ओझोन फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचा शिक्षण रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ओझोन फाउंडेशन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत करण्यासाठी अतिशय प्रयत्नशील काम करत असून अशा कामामुळे संस्थेचे समाजामध्ये आदराचे स्थान निर्माण झाले आहे गेल्या पाच वर्षापासून या फाउंडेशन मार्फत गौरव सोहळे होत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. यापूर्वी हा पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. उध्दव भोसले, मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. केशव सखाराम देशमुख आदी मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्राचार्य डॉ. सुधीर शिवनीकर हे वर्ष 2024 चे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
प्राचार्य डॉ. सुधीर शिवनीकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख, सांस्कृतिक विभाग प्रमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी ते महाविद्यालयाचे उत्कृष्ट प्राचार्य अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पूर्ण केलात. तसे पाहिले तर या महाविद्यालयात अनेक नामवंत प्राचार्य होऊन गेले परंतु डॉ. सुधीर शिवनीकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील शिक्षणतज्ज्ञ, एक कुशल प्रशासक, एक प्रेमळ व्यक्तिमत्व आणि विद्यार्थी प्रिय प्राचार्य ही त्यांची खास ओळख निर्माण झाली. त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाचा चेहरामोहरा बदलला आहे. आर्थिक, शैक्षणिक आणि भौतिकदृष्ट्या महाविद्यालयाची लक्षणीय प्रगती झाली ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांच्या साधेपणाच्या जोडीला असलेला त्यांचा सच्चेपणा, विद्वत्ता आणि विनयशीलता यांचा अनोखा मिलाफ प्राचार्य डॉ. सुधीर शिवनीकर यांच्या व्यक्तित्वात पाहायला मिळतो. पर्यावरण शास्त्र आणि अध्यापनाच्या क्षेत्रात त्यांनी निष्ठेने कार्य करून एक सृजनशील व प्रतिभावान प्राध्यापक म्हणुन अवघ्या महाराष्ट्राला ते परिचित आहेत. डॉ. शिवनीकर हे इंडियन सायन्स काँग्रेसचे आजीवन सदस्य, जम्मू कश्मीर राज्याच्या लोकसेवा आयोगावर ते विषय तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय रसायन शास्त्र व पर्यावरण शास्त्र समितीचे ते आजीवन सदस्य आहेत त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरणशास्त्र या विषयात मागील तीस वर्षापासून मनमुरादपने मुशाफिरी करत खऱ्या अर्थाने या विषयाला समृद्ध आणि संपन्न बनविले. आपला प्राचार्य पदाचा कार्यकाळ पूर्ण झाला तरी भविष्यात देखील त्यांचे मर्गदर्शन लाभावे अशी सद्भावना कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे यांनी व्यक्त केली. या पुरस्कार वितरण प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र.कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे, अभिनव भारत शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष कैलाशचंद काला, मुक्ताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश महाराज देगलुरकर, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी, उप-प्राचार्य डॉ. कल्पणा कदम, प्रा. अजय संगेवार, डॉ. अर्चना भवाणकर, पर्यवेक्षक डॉ. गोपाळकृष्ण सांगवीकर, डॉ. एस. बी. फड, ओझोन फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप काळे आदी मान्यवर उपस्थित होते.