ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला:कथा “नातलग” लैलेशा भुरे

*कथा- नातलग*
**************************
भर दुपारची वेळ होती.घड्याळात दुपारचे साधारण दोन वाजले असतील.मी जेवण आटोपून बाहेर झाडाखाली कट्ट्यावर पेपर वाचत बसलो होतो.रस्त्यावरून ये-जा करणारेही फारसे नव्हते.उन्हाची झळाळी जाणवत होती.पण झाडाच्या सावलीत थोडा गारवा जाणवत होता.इतक्यात एक बाई डोक्यावर पदर घेऊन आणि तोंडाला मास्क लावून येताना मला दिसली.एवढ्या उन्हात कोण बरे ही बाई निघाली असे वाटून मी निरखून पाहिले.ती बाई जवळ आल्यावर माझ्या लक्षात आलं की ती माझी काकू आहे.मी बघून न बघितल्या सारखं केलं.तिनेही माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि आपल्या घराच्या दिशेने जायला निघाली.


गेली पंधरा वर्षे आमच्यात कोणतीच बोलचाल नाही.कारण होतं वडिलोपार्जित वाड्याचं.वडिलोपार्जित वाड्याचा वाद होता माझ्या बाबांचा आणि काकांचा.माझे वडील जाऊन आता पाच-सहा वर्षे झाली होती.पण काका-काकू आमच्याशी अजूनही अबोला धरून होते.काकांना कारकूनाची सरकारी नोकरी होती आता काका रिटायर झाले होते.मी, माझी आई,माझा लहान भाऊ आणि आमच्या दोन बायका,माझा एक लहान मुलगा असा आमचा परिवार होता.काकांना एक मुलगा किशोर आणि मुलगी अवंती असा त्यांच्याकडे चौघांचा खटला होता.अवंतीने मायक्रोबाॅयलाॅजीमध्ये एम.एस्सी.केले होते आणि तिला बाहेरगावी नोकरी लागली होती.किशोरही हुशार निघाला.त्याने इंजिनिअरिंग केले आणि आता तो अमेरिकेला चांगल्या पदाच्या नोकरीत रूजू झाला होता.आमच्यात बोलचाल नसली तरी काही बातम्या बाहेरच्या लोकांकडून आमच्यापर्यंत येत होत्या.


घराची वाटणी झाली तेव्हा अर्धा वाडा आम्हाला आणि अर्धा वाडा काकांना मिळाला.आम्ही वाड्याची डागडूजी करून घेतली आणि त्यावर प्रशस्त चार खोल्या बांधून घेतल्या होत्या.काका-काकू आमच्या शेजारीच होते.पण त्यांच्या आणि आमच्या वाड्यामध्ये भली मोठी भिंत बांधली होती काकांनी.आम्ही वाटणी झाल्यापासून काकांकडे ढुंकूनही पाहिले नव्हते.मी झाडाखाली बसलेलाच होतो.काकू घरातून बाहेर पडली आणि रस्त्याने जाताना माझ्याकडे लक्ष न देता थेट नाक्याकडे गेली.ती इतक्या उन्हात कशासाठी नाक्यावर गेली असेल हे बघण्यासाठी मी माझी दुचाकी काढली. बघतो तर काय, ती नाक्याच्या वळणावर उभी होती.मला राहावले नाही.मी तडक तिच्याकडे दुचाकी घेऊन गेलो आणि विचारले,”काकू,काय झालं गं?तू इतक्या उन्हाची कुठे निघालीस ?”काकू थोडी दबक्या आवाजात म्हणाली,”तुझ्या काकांना बीपीचा खूप त्रास होतो आहे.त्यांच्यासाठी गोळ्या घ्यायला मेडिकलमध्ये जाते आहे.गोळ्या संपून दोन दिवस झाले.इथे उन्हाचा रिक्षापण मिळत नाही लवकर.” मी काकूला म्हटलं,”बघू मला कुठल्या गोळ्या आहेत.मी आणून देतो.तू घरी जा.” तिने मला पाचशे रूपयाची नोट आणि औषधाचे जुने पाकीट दिले.मला काकू म्हणाली, “जमलंच तर दोन किलो तुरीची डाळही घेऊन ये.” मी पिशवी आणि पैसे घेऊन काकांच्या बीपीच्या गोळ्या घ्यायला दुचाकीवरून निघालो. वीस-पंचवीस मिनटाने एक फार्मसी उघडी दिसली.तिथून मी काकांसाठी बीपीच्या गोळ्या घेतल्या.दोन महिन्यांच्या गोळ्या एकदम घेऊन टाकल्या.बाजूलाच किराणा मालाचे दुकान होते.तेथून डाळ, तांदूळ विकत घेतले.नंतर थोड्या अंतरावर एक भाजीचे दुकान होते.तेथून कांदे,बटाटे,टमाटर,वांगी वगैरे खरेदी केले.सर्व सामान घेऊन झाल्यावर मी दुचाकीने काकूला सामान देण्यासाठी निघालो.काका बाहेर व्हरांड्यात खुर्चीवर बसले होते.मी दुचाकी वाहन त्यांच्या फाटकापाशी लावले आणि सर्व सामान घेऊन काकांकडे गेलो.सामान त्यांच्यासमोर ठेवले.आतून काकू बाहेर आली.सामान आणलेले बघून तिला खूप आनंद झाला.माझी नजर काकांच्या वाड्यात बाहेरील भिंतीवर लावलेल्या बाबांच्या फोटोकडे गेली.त्यांचा फोटो पाहून माझे मन भरून आले.शेवटी रक्ताची नाती अशी सहजासहजी तुटत नसतात हे माझ्या लक्षात आलं.मी पिशवी काकूला दिली.तिच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.काका खुर्चीवरून उठले आणि माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला.त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.काकू मला म्हणाली,”बरं झालंस रे,तू इतकं सगळं आणलंस.घरी खरंच काही नव्हतं.वरचे किती पैसे देऊ ?”मी पाचशेची नोट तिला परत केली.काकूला आता मोठ्याने रडू फुटलं होतं.मी तिला सावरत म्हणालो,” शांत हो बघू.तुला आठवतं काकू, लहानपणी तू मला गूळ शेंगदाणे खायला द्यायचीस.किती लाड करायची तू माझे.” काकू लगेच आत गेली आणि गूळ-शेंगदाणे घेऊन बाहेर आली आणि ते माझ्या खिशात टाकले.याचाच अर्थ काका-काकू आम्हाला विसरले नव्हते.पण कधी कधी काही परिस्थितीमुळे जवळची नाती दुरावतात हेच खरे.मी काका -काकूचा निरोप घेतला आणि शेजारीच असलेल्या माझ्या घरी निघालो.आईने बाहेर येऊन फाटक उघडलं.तिला सगळे समजले होते.तिचे डोळे पाणावले.तिने माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.
आता मी काही आणायला निघालो की काकू बाहेर येते.माझ्या खिशात पैसे ठेवते आणि पिशवी देऊन सामानाची यादी देते.आम्हीही ठरवलं की आता सगळं जुनं विसरून काका-काकूशी बोलायचं.त्यांना काय हवं ते बघायचं.एक दिवस दुपारी अचानक काकू आमच्याकडे आली आणि आईच्या समोर हात जोडून म्हणाली,”वहिनी मला माफ करा.माझ्यामुळे घराचे दोन तुकडे झाले.” असे म्हणून ओक्साबोक्शी रडू लागली.आईच्याही डोळ्यांतून पाणी वाहू लागले.आता काकूला कळून चुकले होते की आईच्या मनात तिच्याबद्दल आणि काकांबद्दल कुठलीही अढी राहिलेली नाही.शेवटी ऋणानुबंधाची नाती तुटत नसतात.अखेर दोन्ही घरं एकत्र झाली यातच आनंद होता.
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.