स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ सिनेट निवडणूक महाविकास आघाडीच्या ज्ञानतीर्थ पॅनेलचा दणदणीत विजय 2001 पासून सिनेटवर काँग्रेसचे वर्चस्व, भाजपचा उडाला पुन्हा एकदा धुव्वा

नांदेड, दि. 17 ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीचा निकाल तब्बल 18 तासानंतर जाहीर झाला असून या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या ज्ञानतीर्थ पॅनेलने दणदणीत विजय मिळवीला आहे
दहा पैकी नऊ जागांवर या पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपा प्रणित एबीव्हीपीच्या विद्यापीठ विकास मंचच्या
उमेदवाराचा या निवडणूकीत धुव्वा उडाला आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या या निवडणूकीत महाविकास आघाडीने एकहाती विजय संपादन केला.
13 नोव्हेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक पार पडली. मतमोजणीस दि.16 रोजी सकाळी आठ वाजता सुरुवात करण्यात आली. 17 च्या पहाटेपर्यंत मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर दहा जागेसाठी झालेल्या निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणूकीत काँग्रेसच्या पुढाकारातून महाविकास आघाडीने दहाच्या दहा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते, तर भाजपाची विद्यार्थी शाखा असलेल्या एबीव्हीपीनेही विद्यापीठ विकास मंचच्या माध्यमातून निवडणूक लढविली.
दहा जागेसाठी तब्बल 41 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये खुल्या प्रवर्गातून महेश मगर, नारायण चौधरी, युवराज पाटील, विनोद माने विजयी झाले. अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवर अजय गायकवाड यांनी विजय मिळविला. नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून हणमंत कंधारकर अनुसुचित जमाती प्रवर्गातून आकाश रेजीतवाड, भटक्या विमुक्त जाती जमातीतून गजानन असोलेकर तर महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर शितल सोनटक्के यांनी विजय संपादन केला.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानतीर्थ पॅनेलने सतत पाचव्यांदा ही निवडणूक एकतर्फी जिंकली आहे. 2001 पासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.
—–
चौकट ः
धर्मनिरपेक्ष विचारधारेला पाठबळ ः चव्हाण
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने भव्य यश संपादन केले आहे. उच्च विद्याविभूषित मतदार असलेल्या या निवडणूकीत महाविकास आघाडीला जे यश मिळाले आहे. या निवडणूकीच्या निकालावरुन धर्मनिरपेक्ष विचारधारेला मानणारा व पाठबळ देणारा मोठा वर्ग असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
—–
तब्बल 20 वर्षांपासून ज्ञानतीर्थचे वर्चस्व ः सावंत
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 2001 मध्ये ज्ञानतीर्थ पॅनेलची निर्मिती करण्यात आली. विद्यापीठ व विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्तेचे ध्येय नजरेपुढे ठेवून ज्ञानतीर्थ पॅनेल कार्यरत आहे. या पॅनेलच्या माध्यमातून सिनेटची ही पाचवी निवडणूक काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीने जिंकली आहे. याचाच अर्थ मागील 20 वर्षांपासून ज्ञानतीर्थचे सिनेट निवडणूकीवर वर्चस्व असल्याचे ज्ञानतीर्थ पॅनेलचे मार्गदर्शक व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी सांगीतले.