क्रीडा महोत्सव : खो-खो स्पर्धांत रोमांचक सामने

नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुली व मुलांच्या खो-खो स्पर्धांत अतिशय चुरसपूर्ण सामने रंगले. दिवसभर मैदानावर खेळाडूंच्या वेग, कौशल्य आणि संघभावनेचा थरारक अनुभव प्रेक्षकांनी घेतला.
खो-खो (मुली) या क्रीडा प्रकारात पहिल्या सामन्यात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी उत्कृष्ट खेळ करत डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई यांच्यावर एक डाव व २१ गुणांनी विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी प्रभावी खेळाचे प्रदर्शन करत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांना एक डाव व १३ गुणांनी पराभूत केले. तिसरा सामना अतिशय चुरशीचा झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्यावर एक डाव व २ गुणांनी नजीकचा विजय मिळवला. चौथ्या सामन्यात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांना एक गुण व एक मिनिट राखून पराभूत करत पुढे मजल मारली. पुढील सामन्यात यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी दमदार खेळ करत कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ, रामटेक यांचा एक डाव व ८ गुणांनी पराभव केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी वेगवान खेळ करत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांना एक डाव व ११ गुणांनी हरवत शानदार विजय नोंदवला.
खो-खो (मुले) या क्रीडा प्रकारात पहिल्या सामन्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी उत्तम खेळ करत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांना एक डाव व ८ गुणांनी पराभव दिला. यानंतर कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ, रामटेक यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांना एक डाव व २ गुणांनी हरवत विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांनी डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई वर एक डाव व ११ गुणांनी दणदणीत विजय पटकावला. पुढील सामन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणारे यांनी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांचा १० गुणांनी पराभव केला. पाचव्या सामन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी उत्कृष्ट चढ-उतार असलेल्या सामन्यात कवी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यावर एक गुण व ८ मिनिट राखून विजय मिळवला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी दमदार कामगिरी करत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांना एक डाव व ८ गुणांनी मात दिली.
दिवसभर चाललेल्या या रोमांचक सामन्यांमुळे खो-खो स्पर्धांचे वातावरण रंगतदार झाले असून पुढील फेरीतील सामन्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
————————————————————————————————————————————



