क्रीडा महोत्सव: बॅडमिंटन स्पर्धेत रोमांचक सामने

नांदेड: स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५ च्या दुसऱ्या दिवशी बॅडमिंटन मुली व मुलांच्या गटात रोमांचक सामन्यांनी उत्साहाचे वातावरण रंगतदार झाले.
मुलींच्या गटात झालेल्या सामन्यांमध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ, नाशिक यांच्यावर सरशी साधत दिवसाची विजयी सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी उत्कृष्ट कामगिरी करत होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई यांना पराभूत केले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी दमदार खेळ सादर करत कवी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांना मात दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांचा पराभव करत विजय नोंदवला.
यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांना हरवत यश मिळविले.
तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांचा पराभव तर एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई यांनी छत्रपती संभाजीनगर विद्यापीठ संघावर विजय मिळवला.
मुलांच्या गटातही तितकेच चुरसपूर्ण सामने पार पडले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना पराभूत केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी संघर्षमय सामन्यात कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांचा पराभव केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी अमरावती विद्यापीठ यांच्यावर उल्लेखनीय विजय मिळवला. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यावर मात करून पुढे मजल मारली.
मुंबईतील दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई विद्यापीठ यांचा डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ यांच्यावर विजय झाला. तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांना पराभूत करत सामन्याची सांगता विजयाने केली.
क्रीडांगणात दिवसभर सर्व संघांनी शिस्तबद्ध खेळ, ऊर्जस्वल स्पर्धा आणि खेळाडूपणाचा उत्तम प्रत्यय देत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले.
————————————————————————————————————————————



