नांदेड शहरातील तरोडा नाका येथील वाहतूक कोंडी उफाळून वर! वाहतूक पोलिस प्रशासन जागे होणार कधी? नागरिकांचे कठोर प्रश्न अनुत्तरीतच

दि.१५ नांदेड ( उपसंपादक ;सतीश वागरे)—-
शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची तक्रार नागरिकांमध्ये दिवसेंदिवस वाढत असून, यासंबंधीचे अनेक गंभीर प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील तरोडा नाका शेतकरी पुतळा परिसर तर वाहतूक कोंडी, अतिक्रमण, अवैध ऑटो वर्दळ आणि अस्वच्छतेचे केंद्र बनले आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना रस्त्याने चालणेही धोक्याचे बनले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील ‘अवैध ऑटो’ निर्बंधित कधी होणार?
दररोज हजारो अवैध ऑटो रिक्षा तरोडा नाका व शेतकरी पुतळा परिसरातून धडधडत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे ‘मुहूर्त’च नसल्याची उपरोधिक चर्चा शहरात रंगत आहे.
शहरातील तरोडा नाका येथील ट्रॅफिक सिग्नल बंद असल्याने वाहतूक कोलमडली असून, नागरिकांची अक्षरशः दमछाक होत आहे. शिस्तीत ट्रॅफिकसाठी हे सिग्नल पुन्हा सुरू होणार कधी, हा प्रश्न सर्वांचा आहे.

तरोडा नाक्यावरील ऐतिहासिक शेतकरी पुतळा परिसर दुर्दशेच्या छायेखाली. तुटकी फूटपाथ, खड्डे, कचरा आणि अस्वच्छ वातावरणामुळे पुतळ्याचा परिसर उद्ध्वस्त झाला आहे.
ऑटो स्टॅंडजवळच असलेल्या जागेतील अस्वच्छतेमुळे परिसरात दिवसभर असह्य दुर्गंधी पसरत असून, यामुळे स्थानिक व्यापारी व रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बेलगाम ऑटोचालक आणि कर्कश दुचाकीस्वारांवर कारवाई होणार कधी? बेफाम वेगाने धावणाऱ्या दुचाकी, अरेरावी करणारे काही ऑटोचालक, अशा प्रकारांनी वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका वाढला आहे. तरीही कारवाई ‘थंडगार’ का? दबक्या आवाजात नागरिक विचारत आहेत की, वाहतूक पोलिस प्रशासन अवैध ऑटोचालकांना खुलीछूट देत आहे का? चिरीमिरीचा सवाल पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसतो. दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्यानंतर आता पोलिस प्रशासन हालचालीस सुरुवात केल्याचे दिसते नाहीं. परंतु अंमलबजावणी किती काटेकोर होणार आणि नागरिकांना नेमका किती दिलासा मिळणार, हा प्रश्न मात्र प्रश्न राहिला.
नांदेडच्या नागरिकांचा एकच आवाज
“वाहतूक शिस्त लागू करा, रस्त्यावरचा त्रास कमी करा!”



