स्विमिंग सुपरस्टार: प्रा.ओमप्रकाश गुंजकर ( लेखक:डॉ.अजय गव्हाणे)

मानवी जीवनात मैत्री भावना, सकारात्मकता आणि इतरांना सदैव सहकार्य करणारा स्वभाव अत्यंत महत्त्वाचा आहे. या गुणांधारेच व्यक्तीजीवन आणि समाजजीवन स्वास्थ्यपूर्ण आणि आरोग्यदायी राहू शकते. या तीनही गुणांचा संगम असलेले व्यक्तिमत्व म्हणजे यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रा.ओमप्रकाश गुंजकर.
प्रा.ओमप्रकाश गुंजकर हे समाजशास्त्र, इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयात एम.ए.धारक. त्यांना शिक्षणाचा वारसा वडील स्व.नागनाथराव गुंजकर यांच्याकडून लाभला. ते शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. आपल्या मुला-मुलींनी भरपूर शिकावं. उच्चविद्याविभूषित व्हावं आणि नोकरीद्वारे समाजाची सेवा करावी, हा त्यांचा ध्यास.
हा ध्यास पूर्णत्वाला नेणारे प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांना शिक्षणाबद्दल रुची व आवड आणि महत्त्वाचे म्हणजे प्रचंड उत्साह. केवळ इतकेच नाही तर अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला तर ते वावगे होणार नाही. ध्येयवादी शिक्षक, उत्कृष्ट जलतरणपटू, खिलाडी वृत्ती असलेला खेळाडू, व्यवहारवादाचे प्रचंड ज्ञान असलेला; मात्र व्यवहारवादाचा केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग न करता; इतरांना कशा प्रकारे सहकार्य करता येईल, याचे भान असलेला मित्र.
माणसांच्या मोहोळामध्ये राहणारा हा अवलिया. तोडणे सोपे जोडणे अवघड, या म्हणीप्रमाणे माणसांना नेहमी जोडण्याचे अवघड, क्लिष्ट काम स्वीकारलेला हरफणमौला. माणसाने आनंदाने, उत्साहाने जीवन जगले पाहिजे. रडणे, चिडणे, कुढणे, उदासी, निराशा, चिंता, अहंकार हे शब्द त्यांच्या शब्दकोशामध्ये नाहीत. प्रसिद्धीपासून कोसो दूर असणारा हा माणूस. नेकी कर और दर्या मे डाल, या हिंदी वाक्प्रचाराला केवळ भाषणामध्ये सुमधुर शब्दांनी मांडणारा पोपटपंची न होता वास्तवात, व्यवहारात, जीवन जगत असताना त्याचा वापर करणारा दिलदार दोस्त.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी या राष्ट्रीय सणांच्या दिवशी आणि इतरही महत्त्वाच्या दिवशी मित्रांना, सहकार्यांना, परिचितांना निवासी बोलावून अल्पोपहार, भोजनाचा आग्रह करणारा आगंतुक. मदत करण्याची भावना जास्तीत जास्त लोकांमध्ये असते; मात्र आर्थिक मदत करताना भल्याभल्यांचे हात आखडते होतात. दिलेले पैसे परत भेटतील का? हा यक्षप्रश्न चेहऱ्यावरील भावांमध्ये लगेच उमटतो; मात्र अडचणीत आलेल्यांसाठी खिशाचा विचार न करता खिसा रिकामा करणारा, दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंदाला स्वतःचा आनंद समजणारा ओमप्रकाश हा विरळच. मानवी स्वभावातील दानत प्रवृत्ती बऱ्याच प्रमाणात कमी होत चालली आहे. दुसऱ्याच्या दुःखाला समजून वाटेकरी होण्याच्या रस्त्यावर सध्या शुकशुकाट आहे. हा दानत रस्ता निर्जन नसून ओमप्रकाश गुंजकर सारखा सहकारी एकटाच मार्गस्थ असलेला दिसतो. ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अधिकची बाजू.
पैसा क्या साथ मे लेके जाने का क्या? हे अंतिम सत्य असलेले विधान उच्चारणारे पैशाचा साथ मात्र कधीच सोडत नसल्याचे दिसून येते. जवळपास सर्वच अडचणी पैशापासून सुरू होतात आणि पैशापर्यंत येऊनच संपतात, हे माहीत असूनही इतरांना आर्थिक मदत देताना मुख्य विषय बदलण्याचे कौशल्य प्राप्त करण्याला आजकाल चतुराई म्हटले जाते. प्रा. ओमप्रकाश गुंजकर व्यवहारी असले तरी ही चतुराई त्यांच्या अंतरंगात नाही.
आजकाल कोणाकडेच इतरांसाठी वेळ नाही. मेरे पास टाइम नही है, हे आता परवलीचे वाक्य बनले आहे. ओमप्रकाश गुंजकर हे इतरांचे अत्यंत महत्त्वाचे काम असो, की कमी महत्त्वाचे; स्वतःची दिनचर्या व कामे न पाहता बिनदिक्कतपणे समोरच्याचे पूर्ण कार्य तडीस लागेपर्यंत साथ सोबत देणारा मित्र. असा मित्र भेटणे हीच खऱ्या अर्थाने आयुष्याची संपत्ती. राकेश रोशन दिग्दर्शित खुदगर्ज नावाच्या चित्रपटांमध्ये एक गीत आहे,
कुछ भी नही रहता दुनिया मे लोगो,
रह जाती है दोस्ती,
जिंदगी का नाम दोस्ती,
बंदगी का नाम दोस्ती.
तथागत भगवान बुद्धांनी मैत्रीभाव ही महत्त्वपूर्ण भावना असल्याचे प्रतिपादन केलेले आहे. इतरांचे मंगल करणारी मैत्रीभावना या पृथ्वी ग्रहावरील मानवी आयुष्य वाचवू शकेल. जात,पात, धर्म, भाषा विसरून आंतरिक मैत्रीभाव जोपासणारा व मित्रांच्या गराड्यात राहून समाजशास्त्रातील सामाजिकता शिकवीत असतानाच ते जगणे न विसरणारा तोच खरा शिक्षक. महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाची केलेली व्याख्या, शिक्षण म्हणजे माणसाचे सामाजिकरण आणि नैतिकीकरण. ही व्याख्या सर्व मानवमात्रांनी आपल्या हृदयावर कोरून ठेवणे आवश्यक आहे.
व्यायामाने शरीराचा विकास होतो आणि संगीताने आत्म्याचा, असे राज्यशास्त्रज्ञ प्लेटो सांगतात. व्यायामाला, क्रीडा स्पर्धांना अग्रक्रम देणारा, उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून केवळ नांदेडच नाही तर मराठवाड्याच्या जलतरण तालिकेवर सर्वच स्पर्धांमध्ये पायाचे ऑपरेशन झालेले असताना देखील सुवर्ण, रोप्य, रजत पदके प्राप्त करून स्वतःचे नाव सुवर्णक्षरांनी नोंदविणारा उत्कृष्ट जलतरणपटू म्हणजे ओमप्रकाश गुंजकर. या सर्व स्पर्धांमध्ये यशस्वीतेसाठी माजी प्र-कुलगुरू व यशवंत महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांची प्रेरणा, प्रोत्साहन आणि पाठीवर शाबासकीची थाप नेहमी लाभत असल्याची प्रतिक्रिया ओमप्रकाश गुंजकर देतात. पदकांच्या प्राप्तीनंतर रिपोर्टिंग करताना, स्विमिंग मधील सुपरस्टार, ही प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी दिलेला बहुमान ओमप्रकाश गुंजकर यांना इतर कोणत्याही बहुमानापेक्षा मोठा वाटतो आणि त्यांच्या आनंदाला द्विगुणीत केल्याची भावना ते प्रगट करतात.
प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांच्यासोबत यशवंत महाविद्यालयातील सेवानिवृत्त वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख आणि सांगवी, अहमदपूर येथील विद्यमान प्राचार्य डॉ. श्रीरंग बोडके आणि प्रस्तुत लेखक बहुतांशी स्पर्धांमध्ये सहभागी होतात. या तिघांनीही मैत्रीची २५ वर्षे पार केलेली आहेत. यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी म्हणून सोमठाणा, चिखली, निळा रोड (तीन वर्ष दत्त घेतलेले गाव) देगाव या ठिकाणी केलेली विशेष शिबिरे संस्मरणीय ठरली आहे. या तिघांमध्ये कामाची विभाजन निश्चित असे. शिबिर निवासी डॉ.श्रीरंग बोडके, धान्य, वस्तू खरेदी, ऑडिट प्रा.ओमप्रकाश गुंजकर आणि व्याख्यान नियोजन, वक्ते, बातम्या प्रस्तुत लेखकाकडे. या तीनही मित्रांचे अजब रसायन अजूनपर्यंत इतर कोणालाच उलगडले नाही. ते अव्याहतपणे निरंतर चालूच आहे. यामागील कारण म्हणजे कोणत्याही प्रकारचा इगो नसणे, जातीपातीच्या चष्म्यातून एकमेकांकडे न पाहणे, दुसऱ्याला कमी लेखून स्वतःचा अवाजवी मोठेपणा निरर्थक सिद्ध करण्याचा प्रयत्न न करणे, मी खूप मोठा, महत्त्वाचा आणि तुम्ही सर्व क्षुल्लक; ही संकुचित वृत्ती नसणे, मी श्रेष्ठ आणि तुम्ही कनिष्ठ अशी गैरमैत्रीची भावना नसणे, मैत्री जोपासून दुसऱ्याच्या खाजगी आयुष्याचा आदर करणे.
मैत्री भावना ही वस्तू आणि भौतिक स्वरूपात नसते; म्हणून ती मोजता येत नाही. मित्रावरील भावनांना शब्दबद्ध करणे देखील अनंत, विस्तारपूर्वक होऊ शकते; म्हणून विस्तारभयास्तव शब्दमर्यादेवर लगाम आणणे, हा लेखनप्रपंचाचा नियम असतो.
लेखनप्रपंच करण्याचे औचित्य व निमित्त म्हणजे प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचा १५ नोव्हेंबर रोजी वाढदिवस. मैत्रीभावनेतील रममान मित्राला मित्राकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
-डॉ.अजय गव्हाणे,
राज्यशास्त्र विभागप्रमुख,
यशवंत महाविद्यालय, नांदेड


