यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विभागीय क्रीडा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन
मैदानी स्पर्धेतून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो - प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन

नांदेड(प्रतिनिधी): शरीर सुदृढ राखण्यासाठी खेळ किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित करताना, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी मैदानी स्पर्धांमुळे खेळाडूंची निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन केले. सायन्स महाविद्यालय येथे नांदेड विभागीय केंद्राच्या वतीने आयोजित विभागीय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुक्त विद्यापीठाचे वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे, विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कलेपवार आणि प्राचार्य डॉ. पठाडे यांची उपस्थिती होती.
खेळांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महत्त्व
पुढे बोलताना प्र- कुलगुरू डॉ. बिसेन यांनी नमूद केले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विविध खेळांना महत्त्व देण्यात आले आहे. मुक्त विद्यापीठातील स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना विद्यापीठ स्तरावरून सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, तसेच त्यांना पुरस्कारानेही सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी प्रास्ताविकात वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कलेपवार म्हणाले की, मुक्त विद्यापीठाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आगामी झोन आणि आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये मुक्त विद्यापीठाचा नावलौकिक वाढवावा.
चार जिल्ह्यांतील खेळाडूंचा उत्साही सहभाग
या विभागीय क्रीडा महोत्सवात नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या चार जिल्ह्यांतील स्पर्धक खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या महोत्सवात सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ, धावण्याच्या स्पर्धा, सांघिक धावण्याच्या स्पर्धा, फेकिंगचे स्पर्धा प्रकार, उडीचे स्पर्धा प्रकार आदी विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता.
क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शेखर जगताप, दिलीप थोरात, विकास पावडे, आईन्स्टाईन मुंडे ,माधव वैद्य,नागनाथ टोणगे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जी. जी. शिंदे यांनी केले, तर आभार नितेश देशमाने यांनी मानले.



