यशवंत महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राच्या संगणक कक्षाचे उद्घाटन नवीन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक – प्र- कुलगुरू डॉ. बिसेन यांचे मार्गदर्शन

नांदेड(प्रतिनिधी): यशवंत महाविद्यालय, नांदेड येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अभ्यास केंद्र विकास निधीतून उभारण्यात आलेल्या संगणक कक्षाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. मुक्त विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शारदा भवन शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. रावसाहेब शेंदारकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे, प्रबंधक श्री. संदीप पाटील, आणि केंद्र संयोजक डॉ. ज्ञानेश्वर पपुलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
रोजगारभिमुख अभ्यासक्रमांवर भर
उद्घाटन समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन म्हणाले की, मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करायला हवा. मुक्त विद्यापीठात लवकरच रोजगारभिमुख अभ्यासक्रम तयार केले जाणार असून, यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी बहिस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एआय (AI) सारख्या तंत्रज्ञानाचा निश्चित वापर करण्याचे आवाहन केले. तसेच, अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातून संगणक कक्षाव्यतिरिक्त इतर सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र सहाय्यक भुजंग, पुयड ,तांत्रिक सहाय्यक डॉ. संतोष पाटील , श्री. प्रभाकर डुकरे, आणि अभ्यास केंद्रातील सर्व समंत्रक आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पाटील यांनी केले, तर आभार डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड यांनी मानले. यावेळी अभ्यास केंद्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



